क्राईमधुळे

खाकीचा धाक की, दिवाळीच्या वसुलीचा खेळ.? देवपूरातील पोलीस ठाण्यात ऐन दिवाळीत अजब प्रकार..! किरकोळ गुटखा विक्रेत्यांना चौकशीच्या नावाखाली बोलावले, मध्यस्थीनंतर सुटका झाल्याची चर्चा.!

खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील देवपूर परिसरात ऐन दिवाळीच्या सणात पोलिसांच्या कथित कारवाईचा एक अजब प्रकार समोर आला आहे. किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पाच ते सात व्यावसायिकांना चौकशी आणि कारवाईच्या नावाखाली थेट पोलीस ठाण्यात बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या कारवाई मागील उद्देश नेमका काय होता? कायद्याची अंमलबजावणी की काही वेगळाच ‘दिवाळी हिशेब’? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मंगळवार दि.१० नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरातील एका पोलीस ठाण्यात किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पाच ते सात जणांना बोलावण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून खाकीचा धाक दाखवत अवैध व्यवसायाचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. अचानक पोलीस ठाण्यात बोलावल्याने या छोट्या व्यावसायिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

अखेर या व्यावसायिकांनी आपल्या हितचिंतकांसह राजकीय पक्षातील एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहाय्यकाला आणि एका नगरसेविकेच्या पतीला मदतीसाठी फोन केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मध्यस्थांची आणि पोलिसांची चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.
‘

‘कारवाई करायची असेल तर मोठ्या माशांवर करा; छोट्या व्यावसायिकांनाच का लक्ष्य करता?’ असा सवाल मध्यस्थांकडून उपस्थित करण्यात आल्याचे समजते. शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा असताना केवळ किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाईचा बडगा का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मात्र, या संपूर्ण प्रकरणाला ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेगळेच वळण मिळाल्याची चर्चा रंगली आहे. ‘सध्या दिवाळीचा काळ आहे. शहरातील सर्व अवैध व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत, मग दिवाळी कशी साजरी करायची?’ अशा आशयाची दबक्या आवाजातील कुजबुज काहींमध्ये झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मध्यस्थी, शाब्दिक वाद आणि कथित चिरीमिरीच्या तडजोडी चर्चेनंतर संबंधित पाच ते सात व्यावसायिकांची सुटका झाल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, याचवेळी एका मोठ्या गुटखा व्यावसायिकानेही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र, ‘तुमचे मीटर वेगळे आहे, यांचा हिशेब वेगळा,’ अशा आशयाचा टोमणा खाकीतील एकाने मारल्याचे सांगितले जाते. जर या चर्चेत तथ्य असेल, तर कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा वेगवेगळ्या व्यावसायिकांसाठी वेगवेगळे निकष लावले जात आहेत का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

एकीकडे किरकोळ विक्रेत्यांवर धाक, दुसरीकडे देवीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू विक्री..!
देवपूर परिसरातील याच पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. खान्देशसह उत्तर महाराष्ट्र आणि परराज्यात प्रसिद्ध असलेल्या धुळे शहराच्या कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील कमानी शेजारी अतिक्रमित जागेवर कथितपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याची परिसरात चर्चा आहे.

विशेष म्हणजे, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात असताना संबंधित पोलीस ठाण्यातील काही व्हीआयपी कर्मचाऱ्यांचे कथित अभय असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर धार्मिक स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या अशा व्यवसायाकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मोठे मासे मोकाट आणि छोटे विक्रेते पोलिसांच्या रडारवर..?
शहरातील अवैध व्यवसाय खरोखरच बंद झाले आहेत का? की कारवाईच्या नावाखाली निवडक व्यावसायिकांनाच धाक दाखवला जात आहे? पोलीस ठाण्यातील कथित आर्थिक तडजोडीच्या चर्चेत कितपत तथ्य आहे? एकविरा देवी मंदिर परिसरातील कथित अवैध दारू विक्रीकडे कोणाचे दुर्लक्ष होत आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. धुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तुर्त एवढेच..!

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 15 =

Back to top button