
‘खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे शहरातील गजबजलेल्या जुना आग्रा रोडवरील मनोहर चित्रमंदिर परिसरात रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून दोन गट आमनेसामने आले आणि परिस्थिती चिघळताच भर बाजारपेठेत चार राऊंड गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून गावठी कट्टा जप्त केल्याचे वृत्त आहे.
अवैध धंदे फोफावत असतील तर जबाबदार कोण.?
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील कथित सट्टा व इतर अवैध व्यवसायांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक व्यवहारातून वाद, त्यातून हाणामारी आणि थेट शस्त्रांचा वापर ही साखळी शहराच्या सुरक्षिततेसाठी गंभीर इशारा मानला जात आहे. मग प्रश्न असा की, शहरातील अवैध व्यवसायांवर पोलिसांची नजर नेमकी किती प्रभावी आहे? अवैध धंद्यांची माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असेल तर त्यावर सातत्याने कारवाई का होत नाही? आणि कारवाई झाली तर ती केवळ काही दिवसांपुरतीच मर्यादित राहते का? सप्टेंबरच्या सुरुवातीला धुळ्यातील अवैध धंद्यांविरोधातील आंदोलनानंतर नागरिकांकडून तक्रारींची यादी पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आली होती आणि कारवाईचे लेखी आश्वासन देण्यात आल्याचे वृत्त आहे.

‘गावठी कट्टा’ प्रकरणांचीही स्वतंत्र चौकशी व्हावी..? धुळे पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर गावठी कट्टे व बेकायदा शस्त्रांवरील कारवायांची नोंद आहे. मात्र काही जणांकडून पोलीस कारवायांबाबत गंभीर आरोप केले जात आहेत. त्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष पडताळणी होणे गरजेचे आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस दलात पोलिसांनी स्वतःहून कट्टा व आरोपी तयार करीत कारवाई दाखविल्या आहेत. संबंधित आरोपीला आवश्यक सेवा-सुविधा आणि न्यायालायातील जामिन पासून इतर आवश्यक सेवा पुरविण्यात येत असल्याचा आरोपांची खात्यात खमंग चर्चा आहे. या सर्व गोष्टी आहेत. त्याला तथ्याचा आधार आहे की नाही, हे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणे आवश्यक आहे. जर असा प्रकार खरोखर घडत असेल तर तो केवळ एका कारवाईचा प्रश्न राहणार नाही; आणि जर हे आरोप तथ्यहीन असतील, तर त्यामागील कारणेही स्पष्ट होणे गरजेचे आहे.
‘कागदी कारवाई’ की प्रत्यक्ष परिणाम..?
जिल्हा पोलीस दलाकडून कारवायांची आकडेवारी, गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी आणि शस्त्र जप्तीची माहिती प्रसिद्ध केली जाते. मात्र सामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, शहरातील अवैध धंदे प्रत्यक्षात बंद झाले आहेत का? शस्त्रांची दहशत कमी झाली आहे का? सामान्य नागरिक सुरक्षितपणे बाजारपेठेत फिरू शकतो का? धुळे पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दल कटिबद्ध असल्याचे नमूद आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या मनातील प्रश्नांना प्रत्यक्ष कारवाईतून उत्तर मिळणे अपेक्षित आहे.
बारा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी कधी..?
पोलीस अधीक्षकांकडून अवैध धंदे, गुन्हेगारी आणि शस्त्रबंदीविरोधात ठोस भूमिका घेतली जाणार का? शहरातील सट्टा, जुगार आणि अन्य कथित अवैध व्यवसायांची मुळापासून चौकशी होणार का? या व्यवसायांच्या आर्थिक साखळीपर्यंत तपास पोहोचणार का? भर बाजारपेठेत गोळीबार होतो आणि नागरिक भयभीत होतात, ही परिस्थिती केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित ठेवून चालणार नाही.
धुळे शहराला नेमकी कायदा-सुव्यवस्था हवी आहे की, केवळ कागदावरील कारवाईची आकडेवारी, याचे उत्तर आता पोलिस प्रशासनानेच द्यायचे आहे.‘गंदा है… पर धंदा है!’ या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी प्रत्यक्षात अवैध धंद्यांच्या मुळावर घाव कधी घातला जाणार? हा प्रश्न आता धुळेकरांच्या सुरक्षिततेशी जोडला गेला आहे.
(तुर्त एवढेच..!)


