
खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या धुळे शहर वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता नागरिकांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः देवपूर परिसरातील काही परमिट रूम बिअर बारजवळ रात्री आठ वाजेनंतर सुरू असलेल्या कथित ‘फिल्डिंग’मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर नियमित ड्युटी केल्यानंतर रात्री काही ठिकाणी धुळे शहर वाहतूक पोलिस विभागातील कर्मचारी साध्या वेशात बार परिसराच्या आसपास उभे राहतात. तेथून मद्यपान करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जाते आणि पुढे काही अंतरावर थांबलेल्या पोलिसांना मोबाईलवरून माहिती दिली जाते, असा आरोप केला जात आहे. त्यानंतर वाहन अडवून तपासणी व दंडात्मक कारवाई केली जाते, अशी नागरिकांची तक्रार आहे.या संपूर्ण प्रकारामुळे जयहिंद महाविद्यालय परिसरापासून वाडीभोकर रोडपर्यंत रात्रीच्या वेळी वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
वर्दीवर जॅकेट, साध्या वेशातील ‘वॉच’ अन् पुढे कारवाई..?
या कथित पद्धतीबाबत आणखी एक गंभीर मुद्दा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही याठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी त्यांच्या गणवेशावर काळ्या रंगाचे जॅकेट घालून उभे राहत असल्याचे, तर दुसरा कर्मचारी साध्या वेशात परिसरावर नजर ठेवत असल्याचे सांगितले जाते. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. जर ही कारवाई खरोखरच मद्यधुंद वाहनचालकांना पकडण्यासाठी केली जात असेल, तर ती अधिकृत, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीनेच का केली जात नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
‘टार्गेट’चा दबाव की रस्ते सुरक्षेचा उद्देश..?
ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधातील कारवाई ही निश्चितच आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या व्यक्तीमुळे स्वतःसह इतर निष्पाप नागरिकांचाही जीव धोक्यात येतो. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
मात्र कारवाईचा उद्देश रस्ते सुरक्षा असावा की केवळ दंडात्मक आकडेवारी पूर्ण करणे? हा मूलभूत प्रश्न आहे. कारवाईची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात जर एखाद्या विशिष्ट परिसरातील बार बाहेरून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असेल, तर त्यातून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाहतूक पोलिसांना ‘शिस्तीचा डोस’ देण्याची वेळ..!
धुळे शहरातील वाहतूक पोलिसांवर नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान आणि कारवाई पूर्णपणे पारदर्शक असणे गरजेचे आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधातील कारवाई करताना अधिकृत तपासणी प्रक्रिया, आवश्यक उपकरणांचा वापर, कारवाईची नोंद आणि नियमांचे पालन याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल अशा पद्धतीने कारवाई होत असल्याच्या तक्रारी असतील, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
पोलीस म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेचा आधार; भीतीचे कारण नव्हे..!
त्यामुळे धुळे शहरातील वाहतूक विभागाने ‘टार्गेट’पेक्षा नियमांना आणि आकडेवारीपेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. देवपूर परिसरातील कथित पद्धतीने कारवाई होत असल्याच्या तक्रारींची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. वाहतूक शिस्त लावण्याची जबाबदारी पोलिसांची आहे; पण पोलिसांच्या कामकाजातही शिस्त, पारदर्शकता आणि नियमांचे पालन असणे तितकेच आवश्यक आहे. नेमके या प्रकरणात आता पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालून याचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. अन्यथा देवपूर परिसरात रात्री आठ वाजेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहील हे मात्र निश्चित..!


