क्राईमधुळे

गुटखा तस्करांशी सोनगीर पोलिसांची ‘सेटिंग’? ट्रक पकडला, गोण्या सापडल्या; पाच लाखांत प्रकरण मॅनेज झाल्याची जिल्हाभर चर्चा..!

खान्देश वार्ता-(धुळे)
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणि पान मसाल्याची खुलेआम तस्करी, त्यात सोनगीर पोलिसांची संशयास्पद भूमिका आणि लाखोंच्या ‘सेटिंग’ची जोरदार चर्चा यामुळे जिल्हा पोलीस दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इंदोरहून डीलक्स ट्रान्सपोर्टमार्फत रवाना झालेल्या आयशर ट्रकमध्ये गुटख्याच्या गोण्या सापडल्यानंतरही मोठी कारवाई न होता प्रकरण ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा रंगली आहे.

शनिवार दि.९ रोजी रात्री धुळ्यातील एका कुख्यात ‘सुपारी किंग’चा महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व पान मसाला ट्रान्सपोर्टच्या मालासोबत आयशर ट्रकमधून महाराष्ट्राकडे पाठविण्यात आला. याबाबतची गोपनीय माहिती सोनगीर पोलिसांना मिळाल्यानंतर रविवारी पहाटे सोनगीर टोलनाक्याजवळील एका हॉटेल परिसरात ट्रक अडवण्यात आला. पोलिसांनी चालकाची चौकशी करत ट्रकची झडती घेतली असता गुटखा पान मसाल्याच्या गोण्या आढळून आल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.

मात्र, इथूनच खरी ‘खेळी’ सुरू झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोनगीर पोलिसांतील दोघांना तब्बल ८० हजारांचा फायदा करून देणारा ‘हलाल’ नावाचा कथित दलाल पुन्हा सक्रिय झाला. रविवारी सकाळीच पोलिस आणि तस्करांमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याची जोरदार चर्चा असून तब्बल पाच लाखांत संपूर्ण प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, ट्रकमध्ये बंदी असलेला माल सापडूनही मोठी अधिकृत कारवाई किंवा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ‘माल पकडायचा आणि सेटिंग करून सोडायचा’ हा धंदाच सुरू आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

गेल्या महिनाभरात सोनगीर पोलीस ठाणे विविध कारवायांतून मोठी आर्थिक उलाढाल करत असल्याच्या चर्चा जिल्हा पोलीस दलात दबक्या आवाजात सुरू होत्या. आता गुटखा प्रकरणामुळे त्या चर्चांना उघडपणे तोंड फुटले आहे.

दरम्यान, शनिवारीच जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत १२ कलमी कार्यक्रम राबवून कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी समोर आलेल्या या प्रकारामुळे त्यांच्या आश्वासनाला दलातीलच कर्मचाऱ्यांनी काळीमा फासल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

हाशु अनावर; म्हणे सांगवीतून धडाका लावतो..!
हाशु ‘माझी सांगवी पोलीस ठाण्यात बदली फिक्स झाली आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी राजकीय पक्षाच्या एका खास व्यक्तीच्या आशीर्वादाने काम झालं’ व ‘अशा वृत्तांना घाबरत नाही’ अशी उघडपणे गर्जना करत आपले हसू करून घेत आहे. एवढ्यावरच न थांबता आता मी सांगवीला गेल्यावर अजून बरेच काही करून दाखवेल’ असा इशाराही देत आहे. अधिकार, बदली आणि राजकीय दबावाच्या जोरावर सुरू असलेल्या या उघड दादागिरीची आता वरिष्ठांनी गंभीर दखल घ्यावीच अशी मागणी सोनगीर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + 12 =

Back to top button