धुळेसामाजिक

साक्री तालुक्यात ६० लाखांचा रस्ता घोटाळा उघडकीस! अधिकाऱ्यांनी ODR नसलेल्या रस्त्यावर उधळला निधी, चौकशीची मागणी..!

खान्देश वार्ता-(धुळे)
साक्री तालुक्यातील नांद्रे ते प्रतिपाडा वस्ती रस्त्याच्या कामात तब्बल ६० लाखांच्या शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा स्फोटक आरोप समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या रस्त्याला अधिकृत ‘इतर जिल्हा मार्ग’ (ODR) चा दर्जाच नाही, त्याच रस्त्यावर ODR साठीचा निधी मंजूर करून खर्च केल्याचा संशय आहे.

नेमकं प्रकरण काय..?
२०२३-२४ या आर्थिक वर्षात नांद्रे-प्रतिपाडा रस्त्यावर पाईप पूल, स्लॅब पूल, सिमेंट काँक्रीटसह विविध कामांसाठी ६० लाख रुपये खर्च दाखवण्यात आला. मात्र तपासात समोर आले की, या रस्त्याला ना अधिकृत अधिसूचना आहे, ना रस्ता क्रमांक. तरीही अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून ODR च्या नावाखाली निधी मंजूर केला आणि उधळला.

कसा झाला ‘कागदी घोटाळा’..?
चुकीचे वर्गीकरण: ODR नसलेल्या रस्त्याला बेकायदेशीरपणे ODR दाखवून निधी लाटला.
बोगस मंजुऱ्या: कोणत्या योजनेखाली कामे मंजूर झाली याचा पत्ताच नाही.
कागदपत्रांची शंका: प्रशासकीय मान्यता, MB, देयके यात मोठा घोळ असल्याचा आरोप असा घोटाळा झाला आहे.

मागणी काय..?
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त CEO आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत मागण्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत की, ६० लाखांच्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक चौकशी करावी, मान्यता, अंदाजपत्रक, MB, बिलांची पडताळणी करावी, रस्त्याचे खरे वर्गीकरण व निधी वैधता तपासले पाहिजे, यातील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी आणि अपहार सिद्ध झाल्यास संबंधितांकडून वसुली करण्यात यावी अशा मागण्या आहेत.

सार्वजनिक पैशाची लूट..?
स्थानिकांच्या मते हा सरळ सरळ शासकीय तिजोरीवर डल्ला आहे. ODR नसलेल्या रस्त्यावर ६० लाख खर्च होतातच कसे, हा सवाल आता जिल्हा परिषदेला भोवणार आहे. प्रकरण गंभीर असल्याने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे. तर दुसरीकडे प्रशासन आता काय भूमिका घेणार? चौकशी होणार की प्रकरण दाबले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + twelve =

Back to top button