क्राईमधुळे

खाकीतील कथित आश्वासनांची धुळे पोलिसांनी दखल घ्यावी; देवपूर परिसरात अवैध दारू विक्रीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष..!

खान्देश वार्ता-(धुळे)
धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांचा प्रश्न आता केवळ कारवाईपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या व्यवसायांना नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. किरकोळ गुटखा विक्रेत्यांना चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यात बोलावून धाक दाखविल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कारवाईची भीती बाळगण्याचे कारण नाही, अशा आशयाची कथित आश्वासने दिली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे, अवैध व्यवसायांविरोधात बातम्या प्रसिद्ध झाल्या तरी काहीही फरक पडत नाही, पत्रकारांनी यापूर्वीही अनेक बातम्या दिल्या आहेत, त्यामुळे व्यवसाय सुरूच ठेवा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, अशा आशयाचे बोल संबंधित पोलीस यंत्रणेतील एका कर्मचाऱ्याकडून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सांगितले जात असल्याची चर्चा आहे. या कथित वक्तव्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतच नव्हे, तर पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जर अशा प्रकारची आश्वासने खरोखरच दिली जात असतील, तर त्यामागे नेमका कोणाचा आधार आहे? अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कायद्याची भीती राहू नये, अशी परिस्थिती निर्माण होण्यास जबाबदार कोण? आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांशिवाय अशा प्रकारचे अभय देण्याचे धाडस कोणाच्या बळावर केले जात आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत देवपूर परिसरातील पाच ते सात किरकोळ गुटखा विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात बोलावल्याची घटना चर्चेत आली होती. मध्यस्थांच्या हस्तक्षेपानंतर संबंधितांची सुटका झाल्याचीही चर्चा होती. या प्रकरणात कारवाईमागील नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कायद्याची अंमलबजावणी करताना मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष आणि किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाई, असा दुहेरी निकष लावला जात आहे का, हा प्रश्नही कायम आहे.

दारू विक्रीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष..!
धुळे शहराचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील कमानीशेजारी अतिक्रमित जागेवर कथित अवैध दारू विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. धार्मिक स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळच असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी असतील, तर संबंधित पोलीस यंत्रणा नेमकी काय भूमिका घेत आहे? किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचा धाक दाखविणाऱ्या यंत्रणेला या प्रकाराची माहिती नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे?

बातम्यांना आव्हान की अवैध धंद्यांना संरक्षण..!
पत्रकारांनी अवैध व्यवसायांविरोधात आवाज उठवू नये, बातम्या प्रसिद्ध करूनही काही फरक पडत नाही, असा संदेश संबंधित व्यावसायिकांपर्यंत हा ‘‘कोनवणे’’ पोहोचवत असेल, तर ही बाब केवळ पत्रकारितेपुरती मर्यादित राहत नाही. ती कायद्याच्या अंमलबजावणीवरील जनतेच्या विश्वासाशी संबंधित ठरते. बातम्यांनंतर कारवाई होण्याऐवजी अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.

खुलासा न करता चौकशी करावी..!
देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुटखा विक्री, कथित अवैध दारू व्यवसाय आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून अवैध व्यावसायिकांना दिल्या जात असल्याच्या आश्वासनांची स्वतंत्र चौकशी व्हावी. संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका, अवैध व्यवसायांवरील कारवाईचा प्रत्यक्ष तपशील आणि तक्रारींकडे झालेल्या दुर्लक्षाची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, खाकीचा धाक सामान्य विक्रेत्यांपुरताच आणि मोठ्या अवैध धंदेवाल्यांसाठी अभयाचे कवच, अशी जनतेत निर्माण होणारी भावना दूर करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
तूर्त एवढेच..!
(अर्थपूर्ण संबंधामुळे देवपुरात अवैध लॉजिंग जोरात सुरू.! पुढील भागात)

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 16 =

Back to top button