
खान्देश वार्ता-(धुळे)
अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शिरपूर शहरात सोमवार (दि.१८) नागरिकांनी मूकमोर्चा काढला. मात्र, मोर्चा आटोपल्यानंतर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात काही आंदोलकांनी अचानक रस्ता अडवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी अरेरावी केली. याच गोंधळाचा फायदा घेत एका संशयिताने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केला.
या हल्ल्यात निरीक्षक हिरे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत ‘स्थिर’ असल्याची माहिती दिली आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गुजराती कॉम्प्लेक्सजवळ आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या धरण्यामुळे शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
या घटनेमुळे शिरपूर शहरात संतापाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या घटनेनंतर निरीक्षक जयपाल हिरे म्हणाले, “शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दखल होता. या गुन्ह्यातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी शांततेत मोर्चा काढला होता. मोर्चा आटोपल्यानंतर काही समाजकंटकांनी गुजराती कॉम्प्लेक्सजवळ वाहतूक अडवली आणि धुडगूस घातला.
नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करून ‘जागेवरच फाशी द्या’ अशा अवास्तव मागण्या केल्या. त्यांना अटकाव करण्यासाठी गेल्यावर माझ्या पाठीवर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केला. त्यात छोटीशी जखम झाली. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे त्यांनी आवाहन केले.



