
(खान्देश वार्ता)-धुळे
लाल दिव्याची गाडी वापरून जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याकडून तब्बल ७१ लाख ३३ हजार९८४ उकळविणाऱ्या महिलेसह दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनी धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
कश्मीरसिंग सरदारसिंग बाजवा (रा. विकास कॉलनी, पटियाला पंजाब) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी लाल दिव्याच्या टाटा सुमो गाडीत येऊन (पीबी११सीझेड/०७५६) या वाहनाला अडवले व वाहन चालकाला आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून मालमोटारीतील मालाच्या पावत्यांची मागणी केली.
यावेळी टॅक्स इन्व्हाईस बिलात फॉर्मच्या नावामध्ये चूक असल्याचे सांगून या अज्ञातांनी कश्मीरसिंग बाजवा यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला व्हॉटउपद्वारे संपर्क साधून तोतया अधिकाऱ्यांनी कश्मीरसिंग यांच्याकडून दंडापोटी १२ लाख ९६ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम १लाख ३० हजार रुपये मोबाईल गुगल पे द्वारे स्वीकारून कश्मीरसिंग यांची फसवणूक केली या प्रकरणी दि.४ जानेवारी रोजी कश्मीरसिंग यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या तपासाला गती दिली. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना सूचना दिल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाने गुन्ह्याची पद्धत व तांत्रिक विश्लेषणावरून स्वाती रोशन पाटील (रा .नासिक) तसेच धुळे पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी बिपिन आनंदा पाटील व इमरान इसाक शेख या तिघांचे नाव निष्पन्न केले. तिघांना अटक करून त्यांच्याकडून या गुन्ह्याची कबुली घेतली.
तिघा संशयतांनी कश्मीरसिंग सरदारसिंग यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांकडून तब्बल ७१ लाख ३३ हजार ९८४ रुपयाची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित फरार असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी बाळासाहेब थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकाने केली आहे.



