
खान्देश वार्ता-(धुळे)
नर्मदा खोऱ्यातील गावांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी असलेली बोट ॲम्बुलन्स अचानक नर्मदेत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने पाण्यात बुडाली. अखेर नंदुरबार प्रशासन व आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न करीत बोट ॲम्बुलन्स पाण्यातून बाहेर काढली. सातपुड्यातील गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरदार सरोवर प्रकल्पात ही बोट ॲम्बुलन्सची मागील वर्षी दीड कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली होती.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मणीबेली, चिमलखेडी, धनखेडी, गमन, सिंदुरी, डनेल, बामणी, मुखडी, अरेठी आदींसह धडगाव तालुक्यातील गेंदा, भूषा, सावरिया दिगर, माळ आदि. गावांसाठी अत्यवस्थ रुग्णांसह गंभीर रुग्णांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचावा यासाठी शासनाने गेल्या वर्षभरापूर्वी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक वेगवान बोट ॲम्बुलन्स खरेदी करून सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात तैनात केली होती.
गेल्या वर्षभरापासून नर्मदा नदीला वेळोवेळी पूर येत असल्याने स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले होते. त्यामुळे अधिक पूर आल्याने स्वयंचलित दरवाजातून पाणी वाहून गेले. त्यामुळे मनिबेली पॉईंटवर उभी करण्यात आलेली बोट ॲम्बुलन्स एका बाजूला झुकलेल्या स्थितीत दिसून आली.
शनिवार दि.२रोजी मध्यरात्री अचानक नर्मदा नदीला पूर आल्याने बोट ॲम्बुलन्स मध्ये पाणी गेल्याने तिला बुडाली. या बोटीला वाचवण्यासाठी अद्ययावत क्रेन महाराष्ट्रातून येण्यासाठी वेळ लागणार होता त्यामुळे प्रशासनाने बडोदा येथून अद्ययावत क्रेनला पाचारण केले केले. अखेर शर्तीच्या प्रयत्नानंतर मंगळवार दि.५ रोजी सकाळपर्यंत या बोट ॲम्बुलन्स ला काढण्यात यश आले.
टेक्निकल टीम करणार तपासणी…..
दीड कोटी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या बोटॅम्ब्युलेन्स काही प्रमाणात पाण्यात बुडाली होती. प्रशासनाने प्रयत्न करून तिला वाचवले. याबाबत टेक्निकल टीम आल्यानंतर तपासणी करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी सांगितले.



