
खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व सुपारी वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला आहे. या कारवाई ट्रकसह ६७ लाख २१ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक ट्रक क्रमांक (एमएच१८ बीजी/३४७३) मधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाखू व सुपारीचे गुजरात राज्याकडून दहिवेल पिंपळनेर मार्गे सटाणाकडे तस्करी होत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिकारी बर्गे यांच्यासह पथकाने रात्रीपासून सामोडे चौफुल्यावर सापळा रचला.
मध्यरात्रीनंतर संबंधित ट्रक पोलिसांना येताना दिसला. यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने पोलिसांना हुलकावणी देत ट्रक पळविला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. त्यावेळी ट्रक चालकाने पिंपळनेर सटाणा रोडवर एका ठिकाणी ट्रक सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. यानंतर पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ट्रकचा शोध घेऊन संबंधित ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला. ट्रकची तपासणी केली असता त्यात फॉर्च्यूनरच्या खोक्या आड मोठ्या गोण्यांमध्ये व लहान प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात वाहतूक साठा व विक्रीस प्रतिबंधित असलेला अवैध सुगंधित तंबाखू व सुपारीचा एकूण ४३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा साठा मिळवून आला. या संशयित परचुटन खोक्याची किंमत ८ लाख ५४ हजार रुपये आहे.
या कारवाईत १५ लाखांची मालट्रक सह सुगंधित तंबाखू व सुपारी संशयित परचुटनचे खोके असा एकूण ६७ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस अधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस, उपनिरीक्षक विजय चौरे व पथकातील भूषण शेवाळे, कांतीलाल अहिरे, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, दावल सैंदाणे, सोमनाथ पाटील, संदीप पावरा, योगेश महाले, दिनेश माळी, विजय पाटील आदींनी केली आहे.



