सामाजिकजळगाव

आजच्या जीव घुसमटायला लावणाऱ्या वातावरणात साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची

विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे मत

खान्देश वार्ता-(धुळे)
आज बेभरवशाचे, अविश्‍वसनीय, असुरक्षित असे वातावरण क्षणोक्षणी येवून जीव घुसमटायला लावणारे आहे. राजकारणात सरकार आपले कर्तव्य विसरले आणि सर्वसामान्य माणसे स्वत:चे प्रश्‍न बाजूला ठेवून राजकारणात पुढे काय घडते यात गुंतलेले असतील तर अशा वेळी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत १८ वे विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांनी मांडले.

IMG 20240203 124854

विचार मंचावर संमेलनाचे उद्घाटक रहेमान अब्बास धामस्कर, मावळते संमेलनध्यक्ष चंद्रकांत वानखडे, प्रा. अशोक पवार, स्वागताध्यक्ष शाम पाटील, करीम सालार, विद्रोही चळवळीच्या अध्यक्ष प्रतिमा परदेशी, गणेश विसपुते, अशोक चोपडे, प्रा.रामप्रसाद तौर, प्रा.नितेश कराळे, मुकुंद सपकाळे, प्रा.लीलाधर पाटील, मिलिंद बागुल, किशोर ढमाले, रणजित शिंदे यांच्यासह साहित्यिक उपस्थित होते. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे हास्य कवी संपत सरल उपस्थित राहू शकले नाहीत. त्याच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले.

IMG 20240203 121253

अनोख्या पद्धतीने उदघाटन
संमेलनाचे उद्घाटन साखळीने जखडलेली लेखनी मुक्त करत आणी मुखपट्टी काढून लेखणीची धार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मुस्कटदाबी दूर सारत केली. महात्मा फुले यांच्या सत्याचं अखंड गायन शीतल गावीत व समुहाने, वामनदादा कर्डक यांचे वंदन माणसाला हे गीत गायन भास्कर अमृतसागर व समुहाने, पावरी वादन अमृत भील व समुहाने केले. संमेलनाचे गीत प्रशांत मोरे यांनी म्हटले. सानेगुरूजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने संमेलन उद्घाटनापूर्वी सानेगुरूजी कन्या व नूतन माध्यमिक तसेच सरस्वती विद्यामंदिराच्या १२५ विद्यार्थ्यांनी खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना म्हटली. प्रास्तविक प्रा. लीलाधर पाटील यांनी तर रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

पुढे बोलताना डॉ. मुलाटे म्हणाले, की प्रत्यक्ष जीवनात शेतीचे, शेतकर्‍यांचे प्रश्‍न अत्यंत बिकट झाले आहेत. एकूणच ढोर मेहनत करूनही झालेली नापिकी, निसर्गाचे प्रकोप आणि बिघडलेले नियोजन यामुळे हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. तिकडे दिल्लीत शासनाने चुकीचे शेतीविषयक कायदे पारीत केल्याने हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांनी प्रदीर्घ काळ तीव्र आंदोलन केले. त्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर गोळीबार करणे, ट्रॅक्टर जमावाच्या अंगावर घालणे अशा माणुसकीला काळीमा लावणार्‍या कारवाया केल्या.

महाराष्ट्राचे शासन चालविणारी सत्ताधारी मंडळी खेड्यापाड्यांतून आणि शेतकर्‍यांच्या घरातून आलेली होती. त्यामुळे सामान्य ग्रामीण माणसाचे प्रश्‍न आणि दुःखभोग संपतील असे सामान्य गरीब ग्रामीण माणसाला वाटत होते; पण हळूहळू त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे मुलाटे यांनी सांगितले.

आपले राज्य आहे, आपले सरकार आहे आणि ते आपली माणसे चालवताहेत हा भ्रमनिरास झाला. काळाबरोबर जुने-नवे प्रश्‍न उफाळून येत राहिले. वाढत राहिले. छोट्या-छोट्या शेतकर्‍यांच्या शेतीचे नियोजनच बिघडले. शेतीत यंत्रयुग अवतरल्याने शेतमजूर मिळेल त्या उद्योगाच्या मागे गावाबाहेर पडू लागला. अलुतेदार, बलुतेदार, छोटे छोटे ग्रामोद्योग करणारी मंडळी परागंदा झाली. शिक्षणाची गंगा खेड्यात आली; पण शिक्षित ग्रामीण तरुणांच्या पिढ्या बेकार फिरू लागल्या. प्रश्‍नांना समजून घेऊन साहित्याच्या माध्यमातून साहित्याच्या निर्मात्यांनी त्यावरील उपायांसह मांडले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक असेल त्या ठिकाणी परखड मांडणी करीत प्रसंगी विद्रोहाची भूमिका स्वीकारली पाहिजे असेही डॉ.मुलाटे म्हणाले.

आज जीवनावश्यक प्रश्नांनी साामान्य माणूस जेरीस आला आहे आणि या राज्यकर्त्यांना धार्मिकतेचा उन्माद चढलेला आहे. धार्मिकतेचा उच्छाद एवढा वाढला आहे की, नवी देवळे बांधणे, जीर्णोद्धार करणे, नसलेले उकरून काढणे यासाठी परधर्मीयांनी आणि स्वत:ही कोर्टकज्जे करणे म्हणजे लोकसेवा आहे, असे या सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचा आरोपही मुलाटे यांनी केला

रहेमान अब्बास धामस्कर
उद्घाटक रहमान अब्बास धामस्कर बोलताना म्हणाले, की विचार यात्रेत संविधानाची पालखी उचलण्याची संधी मिळाली मात्र, यापुढे संविधान वाचविण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. सानेगुरूजींनी सांगितलेला सर्वांवर प्रेम करण्याचा माणुसकी हाच सत्य धर्म आहे. दुसर्या माणसाला गुलाम बनविणारा धर्म असू शकत नाही. युद्धाने काहीही जिंकता येत नाही. हा धडा महाभारताव्यतिरिक्त कोणत्याही पुस्तकातून मिळू शकणार नाही. माणूस वाचला नाही तर धर्म कसा वाचेल असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे साहित्यिकांनी देखील धर्माचे राजकारण समजून घेण्याची गरज विशद केली.

चंद्रकांत वानखडे
मावळते संमेलनअध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या भाषणातून प्रस्तापित समाजव्यवस्थेसह ब्राह्मण्यवादावर हल्ला चढवला. सध्याची परिस्थिती बिकट असून 26 जानेवरीच्या विस्मरणासाठी 22 जानेवारीला उत्सवाची नवीन पंरपरा निर्माण केली जात आहे. असाच प्रयत्न 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिवसाबाबत करण्यात आला. सद्गुण ही विकृती असा सिद्धांत मांडणार्यांच्या विचारांचा पुरस्कार केला जात आहे. नेहरू व गांधी यांना बदनाम करण्यासाठी कथा रचल्या जात असल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला. तीन कोटीवर चालणार्या संमेलनांना शासन प्रेक्षक कुठून देणार असे म्हणत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टिका केली. तसेच आता पतित पावन रामच नव्हे तर भाजप देखील झाले आहे. त्यामुळे पावन होण्यासाठी गंगेऐवजी भाजपच्या गटारीत डुबकी मारावी, अशी निर्भत्सनाही केली.

प्रा. प्रतिमा परदेशी
विद्रोही चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, असे म्हणत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विषमतावादी विचारांचा पुरस्कार करीत असल्याने तेथील खूर्च्या खाली असतात असा आरोप केला. मात्र, विद्रोही साहित्य संमेलनातील ही उपस्थिती म्हणजे विचारांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. बैल म्हणत त्यांनी आमच्या बोलीभाषेचा अपमान केल्यानेच विद्रोही साहित्य संमेलनाची सुरूवात झाल्याचा आठवणी त्यांनी सांगितल्या. बोलीभाषा आमच्या जगण्यातून आल्या आहेत त्यामुळे बोलीभाषेला दुय्यम मारणार्या विचारांवर आम्ही फुली मारतो म्हणत आमचा नाद करायचा नाही असा इशारा दिला.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + ten =

Back to top button