
खान्देश वार्ता-(धुळे)
पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार (दि.१२) रोजी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली होती. याबाबत वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करिता आणि शिक्षण अधिकारी कुवर यांच्या करिता दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत, तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही एका महिला अधिकाऱ्याने अशाप्रकारे लाचेची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल यांच्यासह पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, सागर शिर्के, प्रितेश चौधरी व रेश्मा परदेशी यांनी केली आहे.
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामध्ये, विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांसह दर्जेदार शिक्षण देण्याचाही शासनाची प्रयत्न आहे. त्यासाठी, मोठ्या प्रमाणात निधी देखील जिल्हा परिषदांसह, शासकीय शाळांवर खर्च केला जातो. मात्र, शिक्षण क्षेत्राचे रक्षक म्हणून ज्यांना जबाबदारी देण्यात आलीय. त्यांच्याकडूनच शाळांवर आघात होत असल्याचं या लाच प्रकरणावरुन दिसून येत आहे.



