क्राईमधुळे

धुळ्यात कर्तव्यावरील पोलीस हवालदाराने स्वतःवर झाडली बंदुकीची गोळी..!

खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यावरील पोलीस हवालदाराने बुधवारी सकाळी स्वत:कडील बंदुकीने स्वत:वरच गोळी झाडल्याची घटना बाजार समितीच्या आवारात घडली. या घटनेने जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उमेश दिनकर सूर्यवंशी असे या पोलीस हवालदाराचे नाव असून त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी (वय४८ रा.पोलीस लाईन, धुळे) हे जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावून क्र. ३ मध्ये स्ट्रॉंग रुम येथे कर्तव्य बजावत होते.

या स्ट्रॉंग रुममध्ये निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. पोलीस हवालदार उमेश सूर्यवंशी हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आठ वाजता या ठिकाणी कर्तव्यावर हजर झाले. स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडे एसएलआर रायफल होती.

मात्र सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास गोळी झाडल्याचा मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच हवालदार सूर्यवंशी रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर आले. यावेळी तेथील काही तरुणांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने शासकीय हिरे रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने बाजार समितीच्या आवारात एकच खळबळ उडाली होती.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डीवायएसपी राजकुमार उपासे, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, एलसीबी चे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार तसेच शोध पथकाचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. तर पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, विजय शिरसाठ यांनी पंचनामा केला.

हवालदार सूर्यवंशी यांनी स्ट्रॉंग रुमच्या चौकीतच रायफलने स्वत:वर झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या छातीला चाटून रुमच्या खिडकीला छेदून बाहेर गेली. घटना घडली त्यावेळी त्यांची वर्दी शेजारीच टांगलेली होती व विश्रांतीसाठी असलेली गादीही रक्ताने माखलेली होती.

तर रायफल एलईडी स्क्रीनजवळ ठेवलेली होती. झाडलेली गोळी शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. या चौकीत सीसीटीव्ही असून त्याचीही तपासणी केली जात आहे. तसेच घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. हवालदार सूर्यवंशी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, यामागचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × one =

Back to top button