
शिरपूर महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात; एक पोलीस कर्मचारी ठार, दोन जखमी
म.टा.वृत्तसेवा,धुळे
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहीवद शिवारात शिरपूर महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात होऊन पोलीस कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात अन्य दोघे कर्मचारी जखमी झाले असून त्यांना शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिरपूर महामार्ग पोलिसांचे व्हॅन क्रमांक (एमएच१८बीएक्स/०२३२) ने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दहीवद शिवारात जात असताना साखर कारखान्याजवळ भारत पेट्रोल पंपासमोर अचानक व्हॅनचा टायर फुटला. यामुळे व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन ने दोन ते तीनदा पलटी होऊन अपघात झाला.
या अपघातात पोलीस कर्मचारी नवलसिंग हवल्या वसावे (वय २९रा. नंदुरबार) हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी प्रकाश राजाराम जाधव व अनिल अण्णा पारधी हे जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
यावेळी अपघातग्रस्तांना तातडीने शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी असलेले प्रकाश जाधव व अनिल पारधी यांच्या सध्या यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र सदर वाहन चालविणारे पोलीस कर्मचारी नवलसिंग वसावे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.



