
खान्देश वार्ता-(धुळे)
आझाद नगर पोलिस ठाण्यात मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फायटर ग्रुपचा स्वयंघोषित प्रमुख ज्ञानसागर उर्फ नाना विठ्ठल साळवे (रा. दिल्लीवाला जिन, जुने धुळे) याला तब्बल आठ महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. आझाद नगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या सुमारास धुळे शहरातील गायकवाड चौक परिसरात ही घटना घडली होती. फिर्यादी सिद्धार्थ राजू देवरे हे घरी असताना साळवेने साथीदारांसह प्राणघातक शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात देवरे यांच्या पोटाजवळ व डाव्या पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले त्यांचे काका दिगंबर देवरे यांच्यावरही डोक्याच्या मागील बाजूस वार करण्यात आला.
या प्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक १७७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी साळवे याचा मागील दहा वर्षांचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता त्याच्यासह संबंधित सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी तब्बल आठ महिन्यांपासून तो फरार होता. या काळात त्याने धुळे जिल्हा सत्र न्यायालय तसेच औरंगाबाद खंडपीठ येथे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले; मात्र पोलिसांच्या प्रभावी बाजू मांडल्याने त्याला जामीन मिळू शकला नाही.
दरम्यान, १३ मार्च रोजी पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की नाना साळवे हा दिल्लीवाला जिन, पारोळा रोड येथे येणार आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा लावला. पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार गौतम सपकाळ, योगेश शिरसाठ, शांतिलाल सोनवणे, विजय शिरसाठ व मकसूद पठाण यांच्या पथकाने कारवाई करत साळवेला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.



