परिक्रमा खंडपिठ धुळ्यात सुरु करा; जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, वकील संघाची मागणी
खान्देश वार्ता,धुळे
नाशिक येथे गेल्या अनेक वर्षापासुन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे परिक्रमा खंडपिठ सुरु आहे. मात्र हे खंडपिठ धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांसाठी अत्यंत गैरसोयीचे आहे. तिन्ही जिल्ह्यातील ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने धुळे शहरात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे परिक्रमा खंडपिठ सुरु करण्यात यावे अशी मागणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, वकील संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱी जितेंद्र पापळकर यांच्याकडे करण्यात आली.
नाशिक येथे परिक्रमा खंडपिठासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्या उलट धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नव्या इमारतीचे बांधकाम आता पुर्ण झालेले आहे. परिक्रमाण खंडपीठ धुळे जिल्ह्यात सुरु करण्यासाठी स्वतंत्र प्रशस्त इमारतीची उपलब्धता आहे. तसेच नाशिक येथे असलेल्या परिक्रमा खंडपिठ धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यासाठी गैरसोयीचे देखील आहे. त्याऐवजी जर धुळे जिल्ह्यात परिक्रमा खंडपीठ सुरु करण्यात आले. तर लगतच्या जिल्ह्यांतील ग्राहकांना देखील त्याचा फायदा होणार आहे.
सध्याच्या स्थितीत नाशिक येथील परिक्रमा खंडपिठात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या निकालावरील अपील तसेच २० लाखावरील फसवणुकीच्या तक्रारींची संख्या मोठी आहे. प्रलंबीत तक्रारींचा तातडीने निपटारा होण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यात परिक्रमा खंडपिठ सुरु करण्यात यावे. तसेच या परिक्रमा खंडपीठासाठी स्वतंत्र मणुष्यबळ देखील उपलब्ध करुन देण्यात यावे. जेणे करुन परिक्रमा खंडपिठातील दाखल प्रकरणांचा मुदतीत निपटारा होवुन ग्राहकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यास मदत होईल.
धुळे शहर हे नंदुरबार जिल्ह्यापासुन १०० किलो मिटर व जळगाव जिल्हा मुख्यालयापासुन १०० किमी अंतरावर आहे. त्या उलट नाशिक शहर हे धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील ग्राहकांच्या दृष्टीने लांबपल्याचे आहे. नाशिक येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास ग्राहकांचे दोन दिवस जातात. त्या उलट धुळे येथे परिक्रमा खंडपीठ सुरु झाले. तर धुळे,नंदुरबार व जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील ग्राहकांची गैरसोय थांबण्यास मदत होईल.तसेच वेळ आणि पैश्यांची देखील बचत होईल.
सध्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयाच्या परिसरात उपलब्ध असलेली जागा. तसेच तिन्ही जिल्ह्यातील ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने धुळे जिल्ह्यात परिक्रमाण खंडपीठ सुरु करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करत,परिक्रमा खंडपीठ धुळ्यात सुरु करण्याची मागणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, वकील संघाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी पापळकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष अँड.वाल्मीक कचवे, उपाध्यक्ष अँड.योगेश खैरनार, सचिव अँड.पराग खानकरी, अँड.मंगला चौधरी, अँड.अमोल पाटील, अँड.मंथन साळुंखे, अँड.डी.यु.देवरे, अँड.एस.आर.पेशवे, अँड.एम.बी.पवार, अँड.एम.व्ही.घरटे, अँड.पी.आर.सोनार, नंदुरबार येथील अँड.शेख फराज रईसोद्दीन, अँड.अर्जुन महाले, अँड.उज्वल चौधरी आदी उपस्थित होते.