खान्देश वार्ता-(धुळे)
तालुक्यातील वडणे(बुरझड) गावात मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घराचे छत काेसळून ह्दयद्रावक घटना घडली. दुर्घटनेत कुटुंबप्रमुख प्रविण भगवान पाटील(वय४०) व मुलगा गणेश (वय९) या पिता-पुत्रांना प्राण गमवावे लागले. तर प्रविण यांच्या पत्नी प्रेरणा पाटील या गंभीर असून त्यांच्यावर धुळे शहरातील खासगी इस्पितळात शर्थीचे उपचार सुरू आहेत.
तर दोन्ही मुली हेमांगी व भूमी या किरकाेळ जखमी झाल्या आहेत. घर काेसळल्याचा आवाज आल्याने गाव जागे झाले व मदतकार्य राबवत ढिगारा उपसत सर्वांना बाहेर काढले. सर्वांना खासगी वाहनांनी धुळे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असता तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रविण व गणेश यांना मृत घाेषित केले. तर पत्नी प्रेरणा यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. वडणे येथील स्मशानभूमीत प्रविण व गणेश या पितापुत्रांवर साश्रृनयनांनी अंत्यसस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे वडणे गावावर शाेककळा पसरली असून गावात एकही चूल पेटली नाही. प्रवीण पाटील हे शेतकरी कुटुंबातील आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने संसाराचा गाडा हाकलून आपल ध्येय गाठण्यासाठी धडपड सुरू असताना आपल्या परिवारास साथ देणाऱ्या परिवाराचा कर्ता पुरुष प्रवीण पाटील उर्फ रावसाहेब व मुलगा गणेश यांचे अकस्मात निधन झाल्याने गाव सुन्न झाले अशी माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली आहे.