सारंखेडा तापी पुलावर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पडले भगदाड
(खान्देश वार्ता)-धुळे
प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने अखेर नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील तापी पुलाला भगदाड पडले आणि वाहतूक अन्यत्र वळवावी लागली. सुमारे तीन वर्षांपासून यासंदर्भात सातत्याने प्रशासनाला सुचित करण्यात येत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे, वाहनधारक आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणे हा प्रकार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केला मोठ्या प्रमाणात दळणवळणाची सुविधा आणि रस्त्याचे जाळे विणण्याचा दावा स्थानिक लोकप्रतिनिधी करतात मात्र प्रत्यक्षात आहे त्या दळणवळणाचे धिंधवडे उडत असल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे.
तापी नदीला महापूर आल्याने शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पुलावरून वाहतूक बंद केली असून तापी नदीने अक्षरश: रौद्ररूप धारण केले आहे. तापी नदीला आलेला पूर बघण्यासाठी पुलाजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, टाकरखेडा गावाच्या दिशेने रविवारी दुपारी पुलावर मध्यभागीच भगदाड पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाची धावपळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा उशिरा पोहचल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. घटना निदर्शनास येताच टाकरखेडा येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक थांबवली. दरम्यान,टाकरखेड्याचा दिशेने पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी व मोटरसायकल स्वारांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून ब्यारेजच्या छोट्या पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे.
सारंगखेडा येथील तापी नदीचा पुलाला रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुलावरून एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर पुलावरील एका खड्ड्यात रुतल्यानंतर टाकरखेडा गावाचा दिशेने पुलाला मोठे भगदाड पडले.
यावेळी सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्याने वाहन तिथून निघाले. परंतु ग्रामस्थ व नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येतात पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन व इतर विभागाला माहिती कळविल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतु घटनेला तब्बल दोन तास होऊनही कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने अनर्थ टाळण्यासाठी पुलावरील वाहतूक रोखली. दरम्यान, नदीत अथांग पाणी वाहत आहे.त्यातच पुलावर भगदाड पडले. पोलिसांना माहिती दिल्यावर देखील पोलीस यंत्रणा तात्काळ पोहचली नाही म्हणून नागरिक रोष व्यक्त केला.
नागरिकांची तारांबळ
दरम्यान, दुपारी साडेचार वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल स्वत: सारंगखेडा पुलाजवळ थांबून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत होते. पुलावर भगदाड पडल्याची माहिती देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. रविवार हा सारंगखेडा येथील आठवडे बाजार असल्याने टाकरखेडा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी येत असतात. पुलावरून वाहतूक बंद केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे.
तसेच हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने तापी दुथडी भरुन वाहत आहे. तापी काठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महापूर आल्याने काही गावे पाण्याच्या विळख्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तापी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. सारंगखेडा व प्रकाशा येथील दोन्ही बॅरेजचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात पूर्णत: गारवा निर्माण झाला असून सूर्याचे दर्शन गेल्या दोन दिवसांपासून झालेले नाही.