
खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कामकाजावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी वाढत असताना वाहतूक शाखेचे अनेक कर्मचारी शहराऐवजी धुळे-चाळीसगाव महामार्गावर, पारोळा चौफुली, नगावबारी चौफुली यासह अन्य ठिकाणी वाहनधारकांवर कारवाई करत असल्याची चर्चा वाहनधारकांमध्ये सुरू आहे.

विशेष म्हणजे खाकीतील वाहतूक पोलिस सकाळी कर्तव्यावर दिसून येतात. मात्र दुपारी एक ते दीड वाजेनंतर वाहतूक कार्यालयात फक्त दोन-तीन कर्मचारी उपस्थित असतात. याशिवाय शहरासह परिसरात कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर दिसून येत नाही. आणि अचानक सायंकाळी पाच वाजेपासून पुन्हा सर्व कर्मचारी आपल्याला दिलेल्या पॉईंट वर हजर झालेले दिसून येतात. हा देखील संशोधनाचा विषय आहे.
वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहर वाहतूक शाखेचे जिल्हा वाहतूक शाखेत रूपांतर करण्यात आले आहे. मात्र या बदलानंतर शहरातील वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर जिल्ह्यातील महामार्गावर शहर वाहतूक पोलीस तैनात असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस शहरातील प्रमुख चौकात कर्तव्यावर असणे गरजेचे आहे.
देवपूर परिसरातील नगावबारी, दत्त मंदिर चौक, एकविरा देवी मंदिर परिसर, पंचवटी चौक तसेच महात्मा गांधी पुतळा परिसर या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी क्वचितच दिसतात. त्यामुळे या भागांत अनेकदा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे संतोषी माता चौक, कमलाबाई शाळा चौक, कराचीवाला खुंट आणि बसस्थानक परिसरातच काही मोजके कर्मचारी नियमितपणे कर्तव्य बजावताना दिसतात. उर्वरित कर्मचारी मात्र सरकारी वाहनांसह पारोळा चौफुली, चाळीसगाव चौफुली, गरताड गाव आदी ठिकाणी महामार्गावर वाहनधारकांवर कारवाई करत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, ‘मार्च एंड’चे कारण सांगून वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचीही चर्चा वाहनधारकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाच्या मूळ कामापेक्षा महसुली कारवाईवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता वाहतूक शाखेने शहरातील चौकांमध्ये प्रभावीपणे कर्मचारी तैनात करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली केवळ कारवाईची मोहीम सुरू असल्याची भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
(क्रमशः)



