खान्देश वार्ता-(धुळे)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी धुळ्यामध्ये भगवा फडकविण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. तसा शब्द माझ्याकडून घेतला होता. ही माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मी भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही. यंदा महापालिकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात भगवा फडकेल. असा विश्वास अनिल गोटे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय आता मरेल तर भगव्यातच असेही गोटेनी सांगितले.
शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाला अनिल गोटेंनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या वतीने गोटेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर गोटेंनी देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. धुळ्यातून शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाने अनिल गोटे यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे गोटेंनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी शुभांगीताई पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, कैलास पाटील, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, प्रशांत भदाने, अविनाश लोकरे, दिलीप साळुंखे, हेमाताई हेमाडे आदी उपस्थित होते.
यावेळी गोटे म्हणाले, अनेकांचा गैरसमज झाला आहे की, मी कोणाकडे तिकीट मागायला गेलो होतो. मी अजिबात तिकीट मागायला गेलो नव्हतो. प्रामाणिकपणे सांगतो कोणाच्या दारात जाऊन पिशवी धरून उभा राहणारा मी नाही. आता शिवसेनेत दोन संजय राऊत झाले आहेत. कट्टर शिवसैनिक कसा असतो हा आदर्श तुम्हाला घालून देईल. आता मी भगव्यातच मरेल असे गोटे हे म्हटल्यावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आमच्या काही लोकांना दम दिला जात आहे, दम देणाऱ्यांना सांगतोय “कमरेत लाथ घालेन” माझा पाय मजबूत आहे. जर कोणाला धमकी येत असेल तर त्याच क्षणाला मला फोन करा. मी २४ तास तुम्हाला उपलब्ध आहे. शिवसेनेच्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर विचार करून ठेवा. असा इशाराही गोटेने दिला आहे.
भाजप प्रणित मुस्लिम आमदार फारुक शहा आणि भाजपच्या एका नेत्याने नगरपालिकेच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले आहेत. आता ५५ हजार पाकीट तयार करीत आहेत. मी तर सांगतो पंधराशे करा, तरीही तुम्ही आमच्या शिवसेनेचा काहीही वाकडे करू शकत नाही. शिवसैनिकांपुढे कोट्यावधी रुपये जरी ठेवले तरी त्यांच्या तोंडाला लाळ येणार नाही. एवढीही मला गॅरंटी आहे.
शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे मी आभार मानतो. सगळ्या लढाऊ शिवसेनेकांचे मी आजन्म ऋणी राहील. असेही गोटेंनी शेवटी बोलताना सांगितले.
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हापासून बाळासाहेब आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. जेव्हा नगरपालिका निवडणुकीत माझे २८ नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा बाळासाहेबांचा फोन आला, मग मी युती केली. तेव्हा हेमा गोटे अध्यक्ष तर शिवसेनेचा उपनगराध्यक्ष झाला होता. यानंतर बाळासाहेबांनी धुळ्यात भगवा फडकवण्याचे मला सांगितले होते. पण तेलगीच्या घाणेरड्या प्रकरणात मला राष्ट्रवादीने गोवले. कारण मी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा तुरुंगातून सुटलो त्याच दिवशी मला बाळासाहेबांचा फोन आला होता. बाळासाहेबांनी मला सांगितले, परिवारासह मातोश्रीवर जेवायला या खूप आग्रह केला. पण मी सांगितले की, साहेब माझ्या नावावर इतका मोठा कलंक लागला आहे. तुमच्यावर शिंतोडे नको उडायला. असे म्हणत मातोश्रीवर जाणे टाळले. तीच आठवण उद्धव ठाकरेंनी माझ्या प्रवेश यावेळी करून दिली असल्याचे गोटेंनी सांगितले.