सारंखेडा पुलाची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पाहणी
(खान्देश वार्ता)-धुळे
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील तापी नदीवर असलेल्या पुलास गेल्या काही दिवसांपूर्वी भगदाड पडले होते. त्याची लांबी व रुंदी मोजण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पथकाने ड्रोनची मदत घेतली आहे. पथकाने केलेल्या पाहणीत पुलावर आठ मीटर लांब आणि तीन मीटर रुंदीचे तीन खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. ड्रोनने काढलेले फोटो वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आले असून दोन दिवसात तज्ञांचे पथक पाहणीसाठी येणार आहे. त्यांचा पाहणी अहवाल आणि छायाचित्रावरून पूल दुरुस्तीचा निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा जळगाव तसेच धुळे जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलास टाकरखेडा गावाच्या टोकाला मोठे भगदाड पडले. त्याची वाढती लांबी वाढत गेल्याने खड्ड्यांची रुंदी अधिकच वाढली असल्याने पुलाचा भरावा सहा मीटरचा मोठा खोल खड्डा पडला. भरावाचा आधार कमी झाल्याने आठ मीटर लांब व तीन मीटर रुंदीचे तीन मोठे भगदाड पुलावर पडले. यामुळे जिल्हा प्रशासनाने सध्या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद केली आहे.
या पुलाच्या पाहणीसाठी राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत शेलार, अभियंता प्रवीण साळुंखे यांचे पथक आले होते. त्यांनी पुलाची पाहणी केली असून ड्रोनद्वारे पुलाचे छायाचित्र घेतले. याचा अहवाल नाशिक व मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयांना पाठविण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात नाशिक येथील बांधकाम तज्ञ पाहणीसाठी याठिकाणी येणार आहेत. त्यांच्या अभिप्रायनंतर पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिली आहे.