Uncategorizedक्राईमधुळे

कथित धर्मभास्कराची अपसंपदा सरकारजमा..!

 

(खान्देश वार्ता)- धुळे
धुळे जिल्हा परिषदेत झालेल्या निधी अपहारातील आरोपी भास्कर वाघची मालमत्ता ३४ वर्षांनी सरकारजमा करण्याचे आदेश शासनाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयात अपील क्र. १५६५ /२००८ मध्ये पारित केलेले आदेश, सदर प्रकरणी विधी व न्याय विभाग व महसूल व वन विभागाने दिलेले अभिप्राय, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने, सदर प्रकरणी आरोपी लोकसेवक भास्कर वाघ विरुध्द दाखल अपसंपदेच्या गुन्ह्यातील गोठविण्यात आलेली स्थावर मालमत्ता सरकार जमा करण्याच्या हेतूने शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी, धुळे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच संबंधितांची स्थावर मालमत्ता वगळता इतर जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

भास्कर वाघ हा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचा रोखपाल होता. धनादेशावर कार्यकारी अभियंत्याची सही झाल्यावर तो धनादेशावरील रक्कम वाढवत असे. १९७५ ते ९० दरम्यान या पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला होता. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्या काळात या अपहार समोर आला होता. या घोटाळयात ७७ आरोपींविरुद्ध १५ कोटी ८२ लाखांचा अपहार केल्याचे १४ गुन्हे नोंदवले गेले. जन्मठेपेची शिक्षा झालेला भास्कर वाघ अजूनही शिक्षा भोगत आहे. धुळे सत्र न्यायालयाच्या २००३ च्या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

उच्च न्यायालयाने शिक्षा कायम केली होती. या निकाला विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात २००८ मध्ये दाद मागितली. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम केली. खटल्याचा अंतीम निकाल लागेपर्यंत वाघ याची संपत्ती जप्त करणे प्रलंबित होते. वाघ याच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केले होते. १७ लाख ३६ हजार रुपयांच्या दागिन्यांचा ऑक्टोबर महिन्यात लिलाव झाला होता.

१९९० मध्ये शासकीय निधी अपहार प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीची मालमत्ता सरकारजमा होण्यास ३५ वर्षांचा कालावधी लागला. सन १९९० च्या दशकात राज्यभर गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर शंकर वाघ व त्याची पत्नी मंगला वाघ या दोघांची स्थावर व जंगम मालमत्ता लवकरच सरकार जमा होणार असे आदेश गृह विभागाने काढले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ याच्या मालमत्तेचे मूल्य ११ लाख ३९ हजार इतके आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + thirteen =

Back to top button