क्राईमधुळे

धुळ्यात कायदा राबवणारे लाटताय आनंदाने ‘गरिबांचा शिधा’

खान्देश वार्ता-(धुळे)
रेशनच्या तांदळाला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तस्करी होते. यात रेशन दुकानदार, पुरवठा शाखा, पोलीस या सर्वांचीच भागीदारी आहे, हे लपून नाही. त्यामुळे अगदी नगण्य कारवाया होताना दिसतात. अशाच प्रकारे गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी धरणगाव येथून निघालेला तस्करीच्या तांदळाच्या ट्रकचा धुळे जिल्ह्यात तोडपाणीसाठी झालेला रंजक प्रवास आणि तोडपाणीच्या टोकन रकमेतून झालेल्या पार्टीत झालेल्या खमंग पण सावधगिरीच्या गप्पा आम्ही आमच्या चोखंदळ, जागृत व जागरूक वाचकांसाठी सादर करत आहोत. केवळ सादरीकरणच नाही तर हा विषय धसास लावण्याचेही अभिवचन आम्ही देतो.

👉 तीन-चार दिवसांपूर्वी धरणगावहून रेशनचा तांदूळ घेऊन निघालेला ट्रक मारुती ब्रेझा कारमध्ये आलेल्या धुळे स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पथकाने रात्रीच्या सुमारास नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडवला.

👉 नरडाणा जवळील हॉटेल चंडिका जवळ हा ट्रक नेला. त्या ठिकाणी काही काळ थांबल्यानंतर ट्रक मालकाशी बोलणे झाले.

👉 यानंतर नरडाण्याहून ट्रक सोनगीर जवळील हॉटेल सागर येथे आणण्यात आला.

👉 त्या ठिकाणी शिरपूर व चोपडा येथील दोन जणांनी फोनवरूनच मध्यस्थी करीत ट्रक सोडवण्यासाठी विनंती केली. अडीच लाखांची मागणी केल्यानंतर अखेर एक लाख दहा हजार रुपयात तडजोड करून ट्रक पोलिसांनी सोडला.

👉 हा ट्रक सोडवण्यासाठी दहा हजार रुपये रोख तर इतर रक्कम ऑनलाईन स्वरूपात पाठवण्यात आली होती. अडीच लाखांची मागणी असलेला ट्रक तडजोडी अंती एक लाख दहा हजार रुपयात सोडण्यात आला.

👉 या चमकदार कामगिरी करणाऱ्या पोलिसांच्या पथकात एक अधिकारी देखील होता असे समजते. तो दारू रिचवत आपल्या जाबाज सहकारी व तडजोड करणाऱ्यांना हळू बोला असे वारंवार सांगत होता.

👉 खानदेश वार्ता निःपक्षपाती पणे संपूर्ण घटनेचा अभ्यास करून व पुराव्यानिशी बित्तम बातम्या देत असतो. या घटनेत देखील सर्व माहिती शहानिशा करूनच आम्ही निपक्षपणे बातमी दिली आहे.

भूक कोणत्याही माणसाला चोर बनवते. हे जरी सत्य असले तरी सर्वार्थाने पोट भरलेले चोरी करण्यास अजिबात कचरत नाहीत. हेही तेवढेच सत्य आहे. शासन गरिबांचे पोट भरण्यासाठी कटीबद्ध असले तरी त्यांच्या हिश्शाचा घास हिरावणारे शासनातीलच विविध विभागांचे बाशिंदे आहेत. हेही ठसठशीत सत्य आहे. याची प्रचिती या प्रकारावरून येते.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 1 =

Back to top button