खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत असलेले व त्यांचे सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर हे दि. १४ व १५ एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांचेकडुन गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता.
त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये जमा करुन मला आणुन दया, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले होते. तकारदार यांना कर्मचा-यांकडून पैसे जमा करुन सदरची लाचेची रक्कम पाच हजार रुपये अधिकारी पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात येवुन तकार दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी करून पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी तक्रारदार यांचेकडे प्रती गैरहजर कर्मचा-यांकडुन एक हजार रुपये याप्रमाणे पाच ही जणांचे एकूण पाच हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम सोमवार (दि.२२)रोजी त्यांचे एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथील राहते घरी स्विकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकुन दिली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस अधिकारी चंद्रकांत पारसकर, सहायक समादेशक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांचे विरुध्द पश्चिम देवपुर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.