
खान्देश वार्ता-(धुळे)
‘मार्च एण्ड’ म्हणजे सरकारी यंत्रणांसाठी आकडे पूर्ण करण्याची धावपळ, हे सर्वश्रुत आहे. मात्र धुळे शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेसाठी वसुली हे केवळ मार्चपुरते मर्यादित नसून वर्षभर चालणारे ‘गुणसूत्र’ बनले आहे, अशी चर्चा नागरिकांत रंगू लागली आहे.
महामार्ग असो किंवा शहरातील प्रमुख चौक, वाहतूक पोलिसांची नजर नेहमीच ‘गबाळ’ शोधत असल्याचा आरोप होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी महामार्गावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे चित्र दिसते. कारण तिथे मोठ्या वाहनांची वर्दळ आणि तत्काळ दंड वसुलीची संधी अधिक असल्याचे बोलले जाते.
या शाखेत दाखल होण्यासाठी मोठी चढाओढ असते. एकदा का नियुक्ती झाली की अधिकारी आणि कर्मचारी तहानभूक विसरून, वेळकाळ न पाहता कामाला लागतात. मात्र या कामामागील प्राथमिक उद्देश वाहतूक सुधारणा आहे की वसुली, हा संशयाचा आणि संशोधनाचा विषय.
विशेष म्हणजे, पोलिस खात्यातील पुरुष कर्मचाऱ्यांबरोबर महिला कर्मचारीही या मोहिमेत तितक्याच सक्रिय आहेत. त्यामुळे ही ‘वसुली मोहीम’ अधिक व्यापक झाल्याचे दिसते. मार्च एण्डची धामधूम संपल्यानंतरही ही मोहीम थांबलेली नाही, उलट ती अधिकच वेगाने सुरू असल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असले, तरी त्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा ‘वाहतूक नियंत्रण’ या नावाखाली सुरू असलेली कारवाई ‘वसुली केंद्र’ बनल्याचा ठपका बसू शकतो. धुळेकर नागरिक आता एकच प्रश्न विचारत आहेत, की ही कारवाई खरोखरच शिस्तीसाठी आहे की स्वकमाईसाठी? प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घेत नागरिकांचा विश्वास परत मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे.
(ता.क. – सोमवार दि.६एप्रिल रोजी सकाळी वाहतूक शाखेची सरकारी गाडी दोन वाहतूक पोलिस कर्मचारी व एक महिला वाहतूक कर्मचारी धुळे-चाळीसगाव रोडवरील गरताड बायपासवर वाहनांना थांबवून दंडाच्या नावाखाली वसुली करीत असल्याचे वाहन धारकांनी सांगितले.)



