(खान्देश वार्ता)-धुळे
शहरातील अवधान एमआयडीसी मधील भूखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्यासह नकाशा मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी याला रंगेहात पकडण्यात आले आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांना अवधान एमआयडीसी येथील भूखंडावर अतिरिक्त बांधकाम करायचे आहे. त्यासाठी त्यांनी दि.७ जून रोजी कार्यकारी अभियंता एमआयडीसी अवधान यांच्या कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज केला होता. तसेच चलनाद्वारे आवश्यक ते शुल्क देखील भरले होते. तक्रारदार यांनी हा अर्ज करून तीन महिने होऊन देखील, त्यांचा अतिरिक्त बांधकामाचा नकाशा मंजूर न झाल्याने बुधवार दि.
६ रोजी अवधान येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाजवळ गेले होते.
त्यावेळी तेथे सल्लागार अभियंता अहमद अन्सारी यांच्याशी भेट झाली. त्यांनी तक्रारदार यांना या कार्यालयात आपली ओळख आहे. तुमचे बांधकाम मंजुरीचे काम या कार्यालयातून करून देतो, त्यासाठी २५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारी वरून पडताळणी अंतिम सल्लागार अभियंता अन्सारी यांना तक्रारदार यांच्याकडे अतिरिक्त बांधकाम मंजुरीचा नकाशा कार्यकारी अभियंता एमआयडीसी अवधान धुळे कार्यालयातून मंजूर करून देण्यासाठी २५हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने केली आहे.