धुळेआरोग्य

अधिकारी कर्मचारी आता घरोघरी जाऊन दिव्यांगांची माहिती घेणार

आ.बच्चू कडू यांची धुळ्यात माहिती

(खान्देश वार्ता)-धुळे
दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन निधी राखीव ठेवावा असा कायदा होता. परंतु हा निधी खर्चच केला जात नव्हता. त्यामुळे आंदोलने करून तात्कालीन मंत्र्यांसोबत बैठक घेऊन शासन निर्णय जारी करण्यास भाग पाडले.

आता दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जात आहे. यामागे खूप संघर्ष आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन केले. अनेक संघर्षानंतर दिव्यांगांसाठी सोन्याचे दिवस आले आहेत. असे प्रतिपादन दिव्यांगांच्या दारी अभियानाचे राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.

धुळे शहरातील जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रात जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग मुलीच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनय गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापौर प्रतिभा चौधरी, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील, महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार कडू म्हणाले, धुळे जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी आता घरोघरी जाऊन दिव्यांगांची माहिती घेणार आहेत. शिक्षण, रोजगार कसलीही मदत लागणार असेल तर त्याची माहिती तीन महिन्यात घेतली जाईल. त्यानंतर दिव्यांगांना विविध अकरा योजनांचा लाभ धुळे जिल्हा प्रशासनामार्फत दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी प्रत्येक दिव्यांगाला भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मंत्रालयातून नव्हे तर दिव्यांगांच्या घरातूनच दिव्यांगांचे धोरण तयार झाले पाहिजे, हा यामागील उद्देश आहे. येथे नेते अभिनेत्यांनी आत्महत्या केल्या. परंतु ज्यांना बोलता चालता येत नाही, दिसत नाही, तो कधी आत्महत्या करीत नाही. त्यांच्यात जगण्याची प्रचंड उमीद आहे.

शिक्षणात दिव्यांगांनी पुढे आले पाहिजे. उद्योग व्यवसायात पुढे येऊन त्यांनी इतर दहा लोकांना प्रेरणा दिली पाहिजे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी कटीबद्ध आहोत. दिव्यांग मंत्रालय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. असे आ. बच्चू कडू यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

तसेच यावेळी जिल्हाधिकारी अभिनय गोयल म्हणाले, दिव्यांगांचे हक्क अधिनियम १९५० नुसार दिव्यांगांचे सात प्रकार होते. राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार ३० लाख दिव्यांग आहेत. मात्र आता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंमलात आला असून दिव्यांगांचे एकूण २१ प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात दिव्यांगांची संख्या अधिक असणार आहे. त्यामुळे २१ प्रकारानुसार दिव्यांगांचा शोध घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि काळाची गरज आहे.

त्यासाठी धुळे जिल्ह्यात मिशन संवेदना हा नाविन्यपूर्ण उपक्रम आता सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दिव्यांगांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय या कार्यक्रमात सुमारे ५ हजार ३०० लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत २८ हजार हून अधिक दिव्यांगांना लाभ देण्यात आल्याचे ही जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

चौकट
मी गोहाटीत खोक्यांसाठी गेलो नव्हतो. मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी सत्तेत सामील होण्याचे निमंत्रण दिल्यावर अगोदर दिव्यांग मंत्रालय देत असाल तर तुमच्या सोबत येतो. अशी अट ठेवली. आणि ती मान्य झाली. त्यानुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय साकार झाले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + fourteen =

Back to top button