खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे जिल्ह्यासह खानदेशातील प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील श्री सती अहिल्या देवीच्या १९३व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवाला मंगळवार दि.२८ जानेवारी पासून सुरुवात होत आहे. पौष कृष्ण १४ पासून सुरु होणाऱ्या यात्रेनिमित्त भाविक नवस पूर्ण करण्यासाठी आवर्जून उपस्थिती देतात.
धुळे तालुक्यातील बोरीस-लामकानी पंचक्रोशीसह, भाविक पायी देखील चालत श्री सती अहिल्यादेवी यात्रेकरिता येतात. यात्रेनिमित्त हॉटेल व्यवसायिक, संसार उपयोगी साधन साहित्य, मनोरंजन करमणूक खेळ साहित्य व इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील यात्रा कालावधीत शांतता कमिटी बैठक संपन्न होऊन, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, यात्रा समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांची नुकतीच यात्रेच्या नियोजननाची बैठक संपन्न झाली. तर यात्रेच्या वेळी सुरक्षा विषयक उपाययोजना, महिला-पुरुष स्वतंत्र दर्शन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था, पार्किंग व्यवस्था याबाबत उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संस्थेचे अध्यक्ष दादासो श्री सुभाष देवरे यांनी दिली. तसेच मंदिर ट्रस्ट मार्फत स्वयंसेवकांची नेमणूक करून यात्रा कालावधीत जबाबदारी निश्चित केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने यात्रा कालावधीत शांतता व नियमावली राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी महाप्रसाद आयोजन-
यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन श्री गणेश टेक्स्टाईल मिलजवळ दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील करण्यात आले आहे. सदरील महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन माजी सरपंच श्री विलास देवरे, युवा उद्योजक निखिल देवरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांनी केले आहे.
काय आहे श्री सती देवीचा इतिहास-
श्री सती अहिल्यादेवी चा जन्म इ.सन १७९६ रोजी झाल्याची आख्यायिका आहे. त्या इ.स.१८३१ मध्ये सती गेल्यात. पती अर्जुन पाटील आजारी पडले असताना त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या निधनाने अहिल्याच्या जीवनात दुःखाचा डोंगर कोसळला होता. सती जाण्याच्या तत्कालीन कालखंडात, पतीबरोबर स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्याचे मनात अहिल्याने निश्चित केले. अर्जुन पाटील यांच्यावर शेवटचे अंत्यसंस्कार सुरू झाले. अहिल्याच्या सती जाण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले होते. पण पतिव्रता अहिल्याने दिव्यशक्तीच्या जोरावर फौजदार व इतरांना चमत्कार दाखवून सर्व अडथळ्यांवर मात केली. पती अर्जुन पाटील यांच्या सरणाकडे धाव घेतली. व त्यातच पहिल्याने स्वतःचा प्राण त्याग केला. तो दिवस सवंत १८८७ फाल्गुन वैद्य १४ वार सोमवार (इ स १८३१)महाशिवरात्रीचा होता.पुढे त्या जागेवर गावकऱ्यांनी मंदिर उभारून, आज श्री सती देवी ट्रस्ट बोरीस च्या माध्यमातून यात्रा उत्सवाची परंपरा सुरू आहे.
धार्मिक महत्त्व-
भाविक भक्त श्रद्धेने दर्शनासाठी येथे येतात. सर्वसामान्य लोक संसारात येणाऱ्या अडीअडचणीतून, संकटातून मुक्तता व्हावी म्हणून श्री सती अहिल्यादेवीस नवस बोलतात. लाखो भाविकांचे नवस पूर्ण होतात. दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनाने पावन होतात.