धुळेराजकीय

धुळ्यात गौण खनिज लुटीत महसूल विभागासह इतर अधिकाऱ्यांचा सहभाग..!

खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे शहर व परिसरातील गौण खनिज लुटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी जाऊन गँबियन वॉलच्या कामाची पाहणी करत पुरावे गोळा केले आहेत. प्रांताधिकारी कार्यालय व गौण खनिज माफिया यांच्या संगणमताचा गंभीर आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे. ‘प्रांताधिकारी साहेब भिंतीचा जिवंत पुरावा तुमच्या पथकाला दिसला नाही’ पण धुळेकरांनी आणि पत्रकारांनी पाहिला. अशा शब्दात माजी आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी पाहणीवेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर हल्लाबोल केला.

लळींग ते दह्याने-बह्याने गाव हद्दीतील गौण खनिज लुटीचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन उभारले आहे. अप्पर तहसीलदार हिंगे यांनी खनिज माफियांसोबत हात मिळवणे केल्याचा आणि कोट्यावधींचा दंड वसूल करून माफ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हप्तेखोरीचे पैसे प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. शिवसैनिकांनी गुलमोहर विश्रामगृह येथील सरकारी इमारतीच्या कामात दोनशे ते अडीचशे ब्रास मुरूम बेकायदेशीररित्या टाकल्याचा आरोप करत ठेकेदाराने खोटे रॉयल्टी पावत्या दाखविल्याचे सांगितले. महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून आठवड्याला पन्नास हजार आणि पंधरवड्याला एक लाख रुपये हप्ता घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय मोराने गावालगत नदीपात्रात तब्बल १५ फूट उंच सहा फूट रुंद आणि सुमारे एक किलोमीटर लांबीचा गॅबियन वॉल परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या भिंतीसाठी किमान तीन हजार ब्रास दगड वापरल्याचा आणि पुढील टप्प्यात आणखी सात ते आठ हजार ब्रास दगड लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून गॅबियन वॉलसाठी वापरलेल्या दगडाची रॉयल्टी व दंड अधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी शिवसेना उबाठाकडून करण्यात आली आहे.

निवेदन देताना माजी आमदार अनिल गोटे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, कपिल लिंगायत, प्रशांत ठाकूर, अनिल शिरसाठ यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × four =

Back to top button