
खान्देश वार्ता (धुळे)
सतयुगात राजा सत्यवानाचे प्राण पत्नी सती सावित्रीने आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून परत आणले होते. ही कथा सर्वश्रुत आहे. याचीच प्रचिती कलियुगात पाहावयास मिळाली आहे. पत्नीने पतीला आपली किडनी दान करून पतीला जीवदान दिले आहे. चोपडा तालुक्यातील अडावद येथील ही घटना आहे. अडावद येथील सरताज खान यांना गेल्या नऊ वर्षापासून किडनीच्या आजाराचा त्रास होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे काही वर्षापासून जेमतेम प्राथमिक उपचार घेत होते.
मात्र खान कुटूंबाने धुळ्यातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधील किडनीरोग तज्ञ डॉ. विकास राजपूत यांच्यासमोर आपल्या उपचाराचा पाढा वाचला. यावेळी डॉ.राजपूत यांनी किडनी निकामी झालेल्या सरताज खान यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.
डॉक्टर म्हणजेच देवदुत असतो. याप्रमाणे डॉ. राजपूत यांनी खान कुटुंबीयांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत किडनी प्रत्यारोपण करून देण्याचा हमी दिली. मात्र यासाठी कुटुंबातील रक्ताच्या नात्यात असलेल्या अथवा जवळीक असलेल्या नातेवाईकांमधून किडनी देण्यास कोणी तयार असेल तर पुढील प्रकिया करता येईल. असा सल्ला डॉ.राजपूत यांनी खान कुटूंबियांना दिला.
यानंतर रुग्ण सरताज खान यांची पत्नी आयेशा खान यांनी पुढे येत आपल्या जीवन साथीला आपली एक किडनी देण्याचे ठरविले. पतीचे प्राण वाचविणे ही आपल्यासाठी सत्त्वपरीक्षा आहे. त्यांन पुढे काय होईल याचा विचार न करता पत्नी आयेशा यांनी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या पतीला किडणे देऊन त्यांच्या उरलेल्या आयुष्याची वाटेकरी बनली. यात सर्वात मोठे योगदान म्हणजे धुळे शहरातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्याकडून सरताज खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेतून मोफत करून देण्यात आली. यावेळी किडनीरोग तज्ञ डॉ. विकास राजपूत व मूत्ररोग तज्ञ डॉ. जितेंद्र चौधरी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करून रुग्णाला दहा दिवसात घरी जाण्याची परवानगी दिली.
मात्र किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाची एक महिना काळजी घ्यावी लागते. त्यामुळे धुळ्यातच भाड्याने घर घेऊन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जेणेकरून होणाऱ्या इन्फेक्शन पासून वाचता येईल. डॉ विकास राजपूत यांनी आतापर्यंत शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून 40 हुन अधिक शासनाच्या योजनेतून मोफत किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.