सीईओची बदली नव्हे तर हकालपट्टी; धुळे जिल्हा परिषद आवारात नागरिकांना पेढे वाटले
खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची जळगाव येथे बदली झाल्याने जिल्हा परिषद सदस्य सुनिता सोनवणे व शहाणाभाऊ सोनवणे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत आनंदोत्सव साजरा केला. सीईओची बदली नव्हे तर हकालपट्टी झाल्याचे म्हणत त्यांनी जिल्हा परिषद आवारात नागरिकांना पेढे वाटले. तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारावरच गोमूत्र शिंपडून वास्तू कथितरित्या पवित्र केली.
या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल करत तो एक मताने मंजूर केला होता. अखेरीस मंगळवारी सायंकाळी राज्यातील आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात शुभम गुप्ता यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर विशाल नरवाडे येणार आहेत.
बदलीचे वृत्त झळकल्यानंतर बुधवारी सकाळी जिल्हा परिषद सदस्य सुनिता सोनवणे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते शहाणाभाऊ सोनवणे यांनी जिल्हा परिषद आवारात मोठा आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहाणा भाऊ सोनवणे म्हणाले, सीईओ शुभम गुप्ता यांची बदली नव्हे तर हकालपट्टी झाली आहे. सीईओच्या हुकूमशाहीला कंटाळून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या ५१ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध मतदान केले. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सात महिन्यात कुठल्या सीईओंची हकालपट्टी झाली आहे. आम्ही गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी, विद्यार्थ्यांसाठी बस आणि रस्त्यांची मागणी करत होतो. वेळोवेळी सभागृहात आवाज उठवला. मात्र सीईओ गुप्ता यांनी साधी चर्चा करण्याची तसदी देखील घेतली नाही. शिवाय निवेदन देण्यास गेलो असता तेथे कार्यरत नव्हते. म्हणून आंदोलन केले. तेव्हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
वास्तविक आम्ही तीस हजार लोकांचे प्रतिनिधित्व आम्ही करतो. जनतेची समस्या मांडतो हे आमचं कर्तव्य आहे. तसे करणे गुन्हा असेल तर आम्ही वारंवार आंदोलन करू, भले कितीही गुन्हे दाखल होऊ द्या. सीईओ शुभम गुप्तांची हकालपट्टे झाल्याने आम्हाला आनंद होत आहे. मात्र त्यांनी ॲट्रॉसिटी विनयभंगासारखा गंभीर गुन्हा केला आहे. आम्ही पोलिसात तक्रार देखील केली. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच आमचा विजय होईल. अशी प्रतिक्रिया ही शहाणाभाऊ सोनवणे यांनी यावेळी दिली.