माेफत धान्य, साड्या वाटपावर मा.आ.अनिल गाेटेंचे आसूड.!
खान्देश वार्ता-(धुळे)
केंद्र सरकारच्या माेफत धान्य आणि साड्या वाटप याेजनेवर माजी आमदार अनिल गाेटे यांनी आसूड ओढले. या याेजना म्हणजे गरिबांची थट्टा आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या आहेत असा आराेप त्यांनी पत्रपरिषदेत लगावला.
गाेटे पुढे म्हणाले, की स्वस्त धान्य दुकानातून मिळत असलेल्या साड्या कूचकामी आहेत. यासह दर महिन्याला ९० रूपये मुल्याचे धान्य विनामूल्य देण्याचे श्रेय लाटले जात आहे. गरिबातला गरीब लग्न करताे, मुलाबाळांना जन्माला घालताे मग ताे आपल्या पत्नीला व मुलाबाळांना कपडे घेऊ शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. साड्या वाटून अब्रू काढली जात असून आम्ही गरीब आहाेत लाचार नाहीत, याची किंमत श्रेय लाटणाऱ्यांना चूकवावी लागेल असा घणाघात त्यांनी केला.
एकीकडे देशाच्या धान्य काेठारात भर टाकत दुसरीकडे शेतकऱ्याला शेती परवडू नये अशी व्यवस्था केली जात आहे. शेतकरी भूमिहीन हाेऊन सरकारच्या फुकट धान्य याेजनेचा लाभार्थी झाला पाहिजे अशा कार्यक्रमाची बेमालूमपणे अंमलबजाणी केली जात आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान याेनजेद्वारेही शेतकऱ्यांचा अवमान केला जात आहे. शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांना श्रीमंत करून देशातील शेतकऱ्यांना देशाेधडीला लावण्यापेक्षा शेतमालाला हमी भाव द्यावा असे परखड मत त्यांनी मांडले.