Dhule Police Newsखान्देश वार्ता-(धुळे)
आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलिसांनी स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आशयर वाहन व एका स्विप्ट कारसह ३६लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आयशरमध्ये सिमेंट पत्र्यांच्या खाली लपवून १६ लाख ८९ हजार ६०० रुपये किंमतीचे दारु बेकायदेशीरपणे वाहून नेत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावरील नगांव गावाच्या शिवारात करण्यात आली.
(एमएच०५एएम/७१७६) या क्रमांकाच्या आयशर वाहनासह (एमएच४७बीएल/२९६७) या क्रमांकाची स्वीप्ट कार शिरपूरच्या दिशेने जात असून या वाहनांमध्ये अवैध दारुची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी धुळे तालुक्यातील नगांव शिवारात सापळा रचला आणि स्विप्ट कार आणि आयशर वाहन या ठिकाणी पोहचताच पोलिस पथकाने दोन्ही वाहने थांबवली.
कार मधील व्यक्तीची चौकशी केली असता प्रद्युम्न जितनारायण यादव (वय २५ रा.गांधीनगर), विरेंद्र कल्पनाथ मिश्रा (वय ३५ रा.वसई जि.पालघर) तर आयशर वाहनातील श्रीराम सुधाकर पारडे (वय ३२रा.कल्याण पुर्व) आणि राकेश रामस्वरुप वर्मा (वय ६० रा.उदयपुर राजस्थान) अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत चौघांकडून १६लाख ८९ हजार ६०० रुपये किंमतीचे दारुचे ३२० खोकी, १३ लाखाचे आयशर वाहन आणि ७ लाखाची कार असा एकुण ३६ लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी व पथकातील अमरजित मोरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी व राजेंद्र गिते यांनी केली आहे.