खान्देश वार्ता-(धुळे)
नंदुरबार जिल्ह्यातील आरटीओच्या नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एका खासगी व्यक्तीला ५० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तर याचवेळी सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या देवरे व देशमुख नावाच्या दोन आरटीओ अधिकाऱ्यांना देखील ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन उशिरापर्यंत चौकशी देखील केली होती असे समजते. मात्र त्यातून नेमकं काय निष्पन्न झाले हा मात्र आता संशोधनाचा विषय बनला आहे.
तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील हाडाखेड या सीमा तपासणी नाक्यांवर खाजगी इसम वाहनधारकांकडून अवैधरित्या वसुली करत असतील तर त्या ठिकाणी कार्यरत असलेले परिवहन विभागाचे अधिकारी नेमके करता काय.? याची पडताळणी आता सीसीटीव्ही फुटेज पाहून केली पाहिजे. या ठिकाणच्या परिसरात चारही बाजूंनी १०० मीटर अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर सर्व भांडाफोड होईल अशी मागणी आता वाहन धारकांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आरटीओच्या नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एका खासगी व्यक्तीला ५० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे या व्यक्तीला नेमके पाठबळ कोणाचे आणि हा कोणासाठी लाचेची मागणी करत होता, याची चौकशी करण्यात येत आहे.
नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील लाचखोरी हा सर्वांना माहीत असलेला विषय आहे. याआधीही या नाक्यावर अनेक अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. शुक्रवार (दि.२६) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास खासगी व्यक्ती इसराल पठाण याने गुजरातमधून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी नाक्यावर मालवाहू वाहन चालकाकडे ५० रुपयांची मागणी केली. सदर रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असताना त्याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत असून याबाबत शासकीय यंत्रणा मुग गिळून गप्प आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीतील तपासणी नाक्यावर खासगी व्यक्ती उघडपणे कोणासाठी पैसे उकळत होता, याची उकल अजून ही झालेली नाही. या नाक्यावर २२ ते २३ अधिकारी नियुक्त आहेत. विभागातील काही बड्याचा आशीर्वाद असल्याशिवाय शासनाच्या तपासणी नाक्यावर खासगी व्यक्तीकडून वसुली शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईत तपासणी नाक्यावरील वाहन निरीक्षक देवरे व देशमुख नामक दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परंतु, त्यांचा संबंध दिसून आला नसल्याने चौकशी करुन दोन दिवसांनी हजर राहण्याची समज देत त्यांना सोडून देण्यात आले. या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या गाडीसमोरच चोर चोर अशी घोषणाबाजी देखील केली होती. नंदुरबारचे सीमा तपासणी नाके मुळातच वादाचे केंद्र आहेत. लगतच्या गुजरात प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्व सीमा तपासणी नाके बंद करण्यात आले असताना अवैध वसुलीला खतपाणी घालणाऱ्या या तपासणी नाक्यांकडे डोळेझाक कशी काय केली जाते. असा प्रश्न ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवरून पुढे येत आहे.
– मुंबई कार्यालयापर्यंत व्हीडिओ व फोटो काढून तक्रार देणार..!
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये जर खाजगी इसम लाच घेताना मिळून आला तर प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी दिसून आले नाही का.? ते कोणते कर्तव्य बजावत होते. याची देखील माहिती समोर आली पाहिजे. आता पुन्हा ठाणे येथील लाचलुचपत विभागाकडे शिरपूर हाडाखेड व नवापूर सीमा तपासणी नाक्यावर लाच घेतली जात असल्याची तक्रार वाहन धारक करणार आहेत. आणि लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यावेळी मात्र गोपनीयरित्या सापळा रचून कारवाई केली तर याठिकाणी सुरू असलेल्या लाच प्रकरणाचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होईल. आणि नेमकं सीमा तपासणी नाक्यांवर खाजगी इसम कोणासाठी काम करतात हे स्पष्ट होणार आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास ठाणे येथील लाचलुचपत विभागाने केला नाही तर याबाबतचे सर्व व्हिडिओ व फोटो काढून तक्रार मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत खान्देश वार्ता निःपक्ष न्युज पोर्टलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न राहील असे ही काही वाहनधारकानी बोलताना सांगितले आहे.