खान्देश वार्ता-(धुळे)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथील एका चोरट्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता चोरट्याने एक लाख २५ हजार रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली काढून दिल्या आहेत. या कारवाईतमुळे मालेगाव पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व पथकाला जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक मुंबई आग्रा महामार्गावर ग्रस्त घालत असताना तालुक्यातील पुरमेपाडा गावाच्या शिवारात एक जण मोटरसायकल सह संशयास्पद उभा असलेला आढळून आला. पथकाने संबंधित व्यक्तीची विचारपूस केली असता त्याने आपले नाव शहारुख रशीद शहा (रा. गल्ली नं-३ इस्लामपुरा मालेगाव) असे सांगितले.
पथकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली. परंतु त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने पथकाला संशय आला. त्याला खाक्या दाखवताच त्याच्या ताब्यातील मोटरसायकल चोरीची असल्याचे कबुली देऊन आपण आणखी तीन मोटरसायकली चोरी केल्याचे त्याने कबूल केले.
तसेच त्याच्या ताब्यातील मोटरसायकलसह पुरमेपाडा गावाच्या शिवारात लपवून ठेवलेल्या तीन मोटरसायकली अशा एकूण एक लाख २५ हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली काढून दिल्या आहेत. या कारवाईमुळे मालेगाव तालुका व पवारवाडी पोलीस ठाणे मालेगाव या दोन पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पथकातील दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, विवेक वाघमोडे यांनी केली आहे.
याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेकडून एका सराईत बुलेट चोरत्यास जेरबंद करण्यात आले आहे त्याच्या ताब्यातून ४० हजार रुपये किमतीची एक बुलेट जप्त करण्यात आली आहे. संबंधित चोरटा जबरी चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असल्याचे समजते. शहरातील देवपूर परिसरातील वाडीभोकर रस्त्यावरील श्रीराम कॉलनीत राहणारे कैलास कांजरेकर यांच्या मालकीची बुलेट (एमएच१९ डीसी/१११५) ही दि.१२ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास चोरीस गेली होती.
याप्रकरणी त्यांनी पश्चिम पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन अज्ञात छोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू असताना मंगळवार दि.२४ रोजी गुन्हे शाखेतील कर्मचारी चेतन बोरसे यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीस गेलेली बुलेट आदिनाथ उर्फ गोल्या बोरसे (रा. दैठणकर नगर, देवपूर धुळे) याने चोरी केली असून सध्या तो वाडीभोकर रोडवर परिसरात जवळ आहे.
त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आदिनाथ बोरसे यास ताब्यात त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना पथकाला दिली. पथकाने त्याची कसून चौकशी केली असता त्याने ४० हजार रुपये किमतीची बुलेट चोरी केल्याची कबुली देऊन ही बुलेट पथकाच्या ताब्यात दिली. आदिनाथ बोरसे याच्या विरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात चोरीचे घरफोडीचे सात गुन्हे तर देवपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक गुन्हा दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. गेल्या तीन वर्षापासून तो जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार झाला होता.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पथकातील हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, चेतन बोरसे, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, प्रल्हाद वाघ, धर्मेंद्र मोहिते यांनी केली आहे.