खान्देश वार्ता-(धुळे)
विधानसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात एकूण पाच उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. यात चार उमेदवारांनी राजकीय पक्षातर्फे तर एका उमेदवाराने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राज्यातील विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दि.२२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली.
यासाठी धुळे शहर मतदार संघासाठी भाजपाकडून अनुप अग्रवाल यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश महाजन मा.खा. डॉ. सुभाष भामरे, मा.आ. राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे गजेंद्र अंपलकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शिंदखेडा मतदार संघासाठी भाजपाचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. यावेळी माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, जि.प. अध्यक्षा धरती देवरे, बबन चौधरी, किरण शिंदे, नारायण पाटील आदी उपस्थित होते. तर शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशीराम पावरा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.