खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे तालुका पोलिसांनी एका मोटरसायकल चोरट्याला जेरबंद करून त्याचे ताब्यातून चोरी केलेल्या दहा मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे धुळे तालुका पोलीस ठाण्यासह नंदुरबार, जळगाव, मालेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात तालुका पोलिसांनी प्रदीप मधुकर सैंदाणे (रा. महिंदळे ता. धुळे) यास अटक केली होती. त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या ३० हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल (एमएच१८ बीटी/३५०७) हस्तगत करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला होता. यानंतर तालुका पोलिसांनी प्रदीप सैंदाणे या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर तालुका पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता प्रदीप सैंदाणे याने आपण धुळ्यासह नंदुरबार, जळगाव, मालेगाव येथून आणखी काही मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच त्याने विविध ठिकाणी चोरी केलेल्या ४ लाख दहा हजार रुपये किमतीच्या एकूण दहा मोटरसायकली पोलिसांना काढून दिल्या. या कारवाईमुळे नंदुरबार शहर, मालेगाव शहर आणि जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली नंदुरबार, जळगाव, मालेगाव येथील असल्याने त्या हस्तांतर करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत गुन्ह्यातील कोठडीत असलेला संशयित आरोपी प्रदीप सैंदाणे याच्याकडून धुळे तालुका पोलीस त्याच्या साथीदाराविषयी माहिती घेत असून या तपासात आणखी काही जणांना अटक होण्याची व मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्री उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व पथकातील किशोर खैरनार मनोज बाविस्कर, सखाराम खांडेकर, कुणाल शिंगाने, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, राहुल देवरे, महेंद्र गिरासे यांनी केली आहे.