
खान्देश वार्ता-(धुळे)
गुलमोहर खंडणी प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार निष्पक्ष तपास होऊन खर्या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटेंनी एसपी श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली आहे.
या गंभीर घटनेबद्ल मुंबई पोलिस कायदा कलम १२४ खाली अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार २६४/२०२५ सदर अदखलपात्र गुन्ह्यामुळे आरोपींना मदत करण्यासाठी मध्यंतरीच्या काळात ज्या घटना घडल्या त्याची आपण दखल घेत फौजदारी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तपास निश्चित दिशेने व्हावा यासाठी मार्गदर्शनही गोटेंनी एसपींना केले आहे.
— हे करा म्हणजे निश्चित दिशेने तपास करता येईल..
गोटे यांनी हे प्रकरण म्हणजे विधीमंडळाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न असून गांभीर्याने घेत योग्य दिशेने तपास करावा यासाठी सूचित केले आहे. ते खालीलप्रमाणे
< तपास अधिकारी राजकुमार उपासेंच्या अहवालात जिल्हाधिकारी कार्यालय, कृष्णाई हॉटेल, मानस हॉटेल यांचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे, संशयित सर्वांना अटक करून फुटेज कोणाच्या आदेशानुसार नष्ट झाले, याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यांनाही सहआरोपी करणे क्रमप्राप्त आहे.
< निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांचे कार्यालय ‘वाररूम’ अर्थात खंडणी गोळा करण्याचे ठिकाण होते. त्यामुळे महेश शेलार, किशोर पाटील तसेच अन्य अधिकारी जे आपल्याकडील गुलमोहर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात त्या सर्वांचे सीडीआर व अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या वापरात असलेल्या सगळ्या मोबाईल फोनचे सीडीआर विनाविलंब ताब्यात घेणे आवश्यक आहे.
< ज्यावेळी फुटेजची तपासणी कराल त्यावेळी काही निवडक शिवसैनिकांना साक्षीदार म्हणून सहभागी करून घ्या. म्हणजे पैशांच्या थैल्या आणणाऱ्या अधिकाऱ्यांची ओळख लवकर पटवता येईल. आणि आपणास निश्चित दिशेने तपास करणेही सोपे होईल.
< घटना घडून आज ५३ दिवस झाले तरी मात्र बारा पैकी एकाही आमदाराने सदर रकमेचा आमचा काहीही संबंध नसल्याबाबत कुठेही कसलाही खुलासा केलेला नाही. यावरून आमच्या नावाने खंडणी गोळा करायला हरकत नाही असा सुप्त पाठिंबाच असल्याचे सिद्ध होते. यामुळे विधीमंडळाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला असून खंडणीखोर आणि अधिकाऱ्यांची तसेच त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांची नार्कोचाचणी (लाय डिटेक्टर टेस्ट) करावी.
< या प्रकरणी संबंधित १२ आमदार, पोलिस अधिकारी आणि आरोपींची भूमिका तपासली पाहिजे, असेही सूचित केले आहे.



