धुळे-सोलापूर महामार्गवरील दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजी नगरचा पडला विसर
खान्देश वार्ता-(धुळे)
Dhule City शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत चाळीसगांव चौफुलीवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लहान-सहान गावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र छत्रपती संभाजी नगरचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे शिव- शंभू प्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर शुक्रवारी (Shinde) शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख (Satish Mahale) सतिष महाले यांनी या ठिकाणी समर्थकांसह चाळीसगाव चौफुली होईल फलक लावलेल्या ठिकाणी आंदोलन केले.
शिवाय क्रेनच्या साहाय्याने या फलकावर ‘छ. संभाजी नगर’च्या नावाचे स्टिकर चिकटविले. या आंदोलनाबाबत सतिष महाले म्हणाले, धुळे विधानसभा क्षेत्रात आ.फारुख शाह यांच्या निधीतून दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. या फलकावर छ. संभाजी नगरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या फलकावर खेडे गावांची नावे घेण्यात आली आहेत. मात्र, छ. संभाजी नगर नाव वगळले आहे. केवळ वेरुळ, दौलताबादची नावे टाकून आमदार काय दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत? हिंदुत्ववादी जनतेचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छ. संभाजी महाराज हे आपल्या आयुष्यात एकही युध्द हरले नाहीत. त्यांच्या पराक्रमाला तोड नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून औरंगाबादचे नामकरण ‘छ. संभाजी महाराज नगर’ असे केले आहे.
त्यामुळे दिशादर्शक फलकावर छ. संभाजी नगरचे नाव टाकले जायला हवे होते. यात कोणताही जातीय द्वेष बाळगण्याचे कारण नव्हते. फलकावर छत्रपती संभाजी महाराज नगरचे नाव नसल्याची बाब आम्हाला खटकत होती. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पवित्री दिनी आम्ही या फलकावरील दौलताबादच्या नावाच्या ठिकाणी ‘छ. संभाजी नगर’ असे स्टिकर लावले आहे. जेणेकरुन या महामार्गावरुन जाणाऱ्यांना हा रस्ता छ. संभाजी नगरकडे जातो हे निश्चित कळेल, असे यावेळी सतिष महाले यांनी सांगितले.