भाजपा लोकशाहीचा गळा घोटत आहे- आ.बाळासाहेब थोरात
(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्हयासह महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची स्थिती असतांना केंद्राचे आणि राज्याचे सरकार सत्तेच्या राजकारणात गुंग आहे. सरकारने दुष्काळ जाहिर करुन शेतकर्यांच्या खात्यात २५ टक्के विम्याची अग्रीम रक्कम तत्काळ जमा करावी अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल असा इशारा काँग्रेसचे महाराष्ट्र विधी मंडळाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.दरम्यान राज्यघटनेवर आघात केला जात असून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचा घणाघातही यावेळी आ.थोरात यांनी यावेळी केला.धुळे जिल्हयातील काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या समारोप सभेप्रसंगी ते बोलत होते.
काँग्रेस पक्षार्फे राज्यात दि.३ सप्टेंबरपासून जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेचा धुळे जिल्हयाच्या समारोप महाराष्ट्र विधीमंडळाचे नेते माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ सप्टेंबर रोजी दुलारी गार्डन नकाणे,धुळे येथे करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, प्रदेश सरचिटणीस शरद आहेर, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले,सौ.अश्विनीताई पाटील,माजी खा.बापू चौरे, माजी आ.वसंतराव सुर्यवंशी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे,प्रदेश सचिव युवराज करनकाळ हे उपस्थित होते. सभेत समारोपाप्रसंगी उपस्थित जनसमुदायापुढे बोलतांना विधीमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी भाजपाच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले कि, भाजपा मूलभुत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जावू नये म्हणून नको त्या गोष्टींवर चर्चा मुद्दामहून घडवून आणत आहे.
चंद्रयान यशस्वी झाले त्याबद्दल शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे मात्र शास्त्रज्ञ बाजूलाच राहिले पंतप्रधानच माध्यमांमध्ये जास्त दिसले. भारतात जी-20 परिषद घेतली. अवाढव्य खर्च केला तो सर्व खर्च जनतेच्या माथी मारला जाईल आणि त्यात महागाईची भर पडले. त्या खर्चात मोठमोठे सिंचन प्रकल्प झाले असते.भारतीय जनता पक्ष माणसामाणसामध्ये भेद निर्माण करुन देशात भितीचे वातावरण पसरवित आहे.राज्य घटनेवर आणि जनतेच्या विचार स्वातंत्र्यांवर गदा आणून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करीत आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेने देशातील माणूस जोडला गेला. शेतकरी, विद्यार्थी, तरुण, डॉक्टर, वकिल, सामाजिक कार्यकर्ते यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांची मते व भावना जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रा आणि जनसंवाद यात्रेमुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली.दरम्यान आ.बाळासाहेब थोरात बोलतांना पुढे म्हणाले कि,आ.कुणाल पाटील यांच्या व्यक्तीमत्वात राज्यात संघटन करण्याचे कौशल्य आहे. त्यामुळे आता राज्यात कॉग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि आ.कुणाल पाटील यांची जबाबदारी आम्ही घेतो.असेही आ.थोरात यांनी शेवटी सांगितले.
अक्कलपाडा झाले म्हणून नदीला पाणी आले…
धुळे जिल्हयाच्या विकासात माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अक्कलपाडा धरण झाले म्हणूनच आज नदीला पाणी आले.पिढ्यांपिढ्या समृध्द करण्याचे काम त्यांनी केले आहे असे उद्धाटन आ.बाळासाहेब थोरात यांनी काढले.
समारोप सभेत बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितल कि, भाजपाच्या दडपशाहीमुळे देशात लोकशाही संपुष्टात येत आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. विचार स्वातंत्र्य राहिले नाही.भारत जोडो यात्रा आणि जनसंवाद यात्रेमुळे देशात बदल घडत आहे.त्यामुळे यापुढे राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार येणार नाही. जिल्हयात भीषण दुष्काळ आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
आजही सरकार शेतकर्यांना अग्रीम विमा रक्कम देण्याचा निर्णय घेत नाही.,दुष्काळ जाहिर करीत नाही त्यामुळे दुष्काळ जाहिर करुन शेतकर्यांना अग्रीम विमा रक्कम तत्काळ दिली नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आ.कुणाल पाटील यांनी दिला.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी भाजपाच्या ध्येय धोरणावर सडकून टिका करीत काँग्रेस हा देशभक्तांचा पक्ष असून भाजपा व्देषभक्तांचा पक्ष असल्याचा घणाघात केला. यावेळी जनसंवाद पदयात्रेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक शरद आहेर, प्रा.विलास चव्हाण, बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
समारोप सभेला विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, आ.कुणाल पाटील यांच्यासोबत अश्विनी पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे,साबीर शेठ,उत्तमराव देसले,प्रदेश सचिव युवराज करनकाळ,खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील,माजी पं.स.सभापती भगवान गर्दे,प्रमोदभाऊ जैन,माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे,उपसभापती योगेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भगवान पाटील, यांच्यासह शिरपुर,शिंदखेडा,साक्री,धुळे तालुका,धुळे शहरातील काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.