म.टा.वृत्तसेवा,धुळे
शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघा सराईतांना आझादनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. यामुळे तीन लुटीच्या घटनांची उकल झाली आहे.
शहरालगत असलेल्या वरखेडी फाटाजवळ सर्विस रस्त्यावर न्यानेश्वर माळी हे (दि.२६) मार्च रोजी सकाळच्या सुमारास आपला ट्रक धुण्यासाठी उभे होते. त्यावेळी दोन जण मोटरसायकलीने आले व त्यांनी चाकूचा धाक दाखवून माळी यांच्याकडील आठ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमान विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
घटनेनंतर आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी वरखडे फाटा व महामार्गवरील उड्डाणपूलावर पहारा ठेवण्याचे पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवार (दि.४) रोजी अर्शद शहा लियाकत (रा. काझीचे शेत नटराज चित्रमंदिराजवळ धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने वरखेडी फाट्याजवळ लुटीची कबुली दिली. तसेच हा गुन्हा अरबाज शहा सुबराती शाह (रा.काजी प्लॉट धुळे) यांच्या मदतीने केल्याचे पोलिसांना सांगितले.
घटनेनंतर अरबाज शहा फरार झाला आहे. अर्शद शाह लियाकत शाह याने पोलीस कोठडीत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती दिली असता त्यांनी अब्दुल फरहान अब्दुल खलित (रा. मेमन जमात खाना धुळे) याच्यासोबत मिळून रानमारा रोड पाटील वाडा हॉटेल रेसिडेन्सी हॉटेल जवळ अशाच प्रकारे धमकावून लुटमार केली होती. पोलिसांनी अब्दुल यास देखील जेरबंद केले आहे. दोघा चोरट्यांकडून दोन मोटरसायकल देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आझादनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे या दोन्ही संशयित आरोपींकडून साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, शशिकांत पाटील व पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे योगेश शिरसाठ, गौतम सपकाळे, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, अनिल शिंपी, अझरुद्दीन शेख, पंकज जोंधळे, मकसूद पठाण यांनी केले आहे.