खान्देश वार्ता-(धुळे)
नाशिक निफाड येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील २७ वर्षीय आरोपीने नाशिक रोड कारागृहात टॉवेल ने गळफास घेऊन शुक्रवार (दि.८) रोजी आत्महत्या केली. मात्र, त्याने आत्महत्या केली नसून कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या मारहाणीतून त्याचा मृत्यू झाल्याचा आराेप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तर मृताच्या मृतदेहावर शनिवारी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात साैरभच्या मृतदेहाचे वैद्यकीय महाविद्यालयाचे समिती सदस्य व नातेवाइकांच्या उपस्थितीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान सौरभ ढगे याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच आता त्याच्या मृत्यू कसा झाला याचा उलगडा होणार आहे.
साैरभ राजू ढगे (वय २७, रा. निफाड जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. त्याचा लहान भाऊ मयूर ढगे याने सांगितलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये नाशिकमधील निफाड येथे खुनाची घटना घडली होती. यात संशयावरून साैरभ याला अटक करण्यात आली हाेती. व नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात हाेता. त्याचा यात जामीन झाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर त्याला अकाेला येथील एका गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेऊन त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. अकाेला येथून जामीन मिळला. पण तो निफाड खून प्रकरणात तारखेला हजर राहत नसल्याच्या कारणावरून नाशिक राेड कारागृहात रवानगी न्यायालयाने केली.
सौरभ ला भेटण्यासाठी मंगळवार (दि.५) रोजी त्याची पत्नी व लहान भाऊ मयूर नाशिकरोड कारागृहात गेले होते. त्यानंतर शुक्रवारी महाशिवरात्री असल्याने मला नवीन कपडे घालायचे आहेत असेही त्याने सांगितले होते. म्हणून भाऊ मयूर ने त्याला कारागृहात नवीन कपडे देखील पाठविले होते. पण गुरुवार (दि.७) रोजी रात्रीच्या सुमारास साैरभला नाशिक कारागृहातील अधिकारी गुंजाळ, गवळी, चाैधरी, आदींनी बॅरेकबाहेर नेत मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून फाशीचा घेतल्याचा बनाव करण्यात आला. कारागृहातील बराकमध्ये तीन अथवा पाच बंदिवान ठेवले जातात.
मात्र, साैरभला एकट्याला स्वतंत्र बॅरेकमध्ये कसे काय ठेवले. तसेच त्याच्या कंबरेवर मारहाणीचे निशाण असून, दाेन्ही पायांच्या माड्यांपासूनचा खालचा भाग काळा पडलेला आहे. त्याच्याकडे एक चिठ्ठीही आढळून आली असून, ती पंचनामा करतेवेळी जप्त करण्यात आल्याची माहिती मयताचा भाऊ मयूर ढगे याने धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत आपल्या भावाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी नाशिकराेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलाे असता शवविच्छेदनाचा अहवाल आणा तरच गुन्हा नाेंद केला जाईल, असे नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पाेलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले अशी माहिती मयूर याने दिली. याप्रकरणी ऑनलाइनही तक्रारही त्याने दिली आहे. दरम्यान, धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात साैरभच्या मृतदेहाचे समिती सदस्य तसेच नातेवाइकांच्या उपस्थितीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे.