खान्देश वार्ता-(धुळे)
शहरात गुरुवारी सकाळी ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले.
मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली असता दोन गटात वादावादी झाली, यातून शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर दगडफेकीला सुरवात झाली. तीन ठिकाणी झालेल्या दगडफेकीत चारचाकी वाहनांचे नुकसान झाले तर अनेकजण जखमी झाले. सुमारे या घटनेची वार्ता शहरात वार्यासारखी पसरल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ई-ए- मिलादनिमित्त शहरात गुरुवारी सकाळी मिरवणूक काढण्यात येत होती. या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून मार्गक्रमण करणार होती.
मात्र, या ठिकाणी एक गट आधीपासूनच उभा असल्याचे सांगितले जात आहे. साधारणतः सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ही मिरवणूक पुतळ्याजवळ आली. यावेळी पुतळ्याजवळ उभा असलेला गट व मिरवणुकीतील काही जणांमध्ये वादावादी झाली. त्यातून शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दगडफेक झाल्याची माहिती शहरात वार्यासारखी पसरली. त्यानंतर डी.आर. हायस्कूल, मंडाले हॉस्पिटलजवळही दगडफेकीला सुरवात झाली. या दगडफेकीत डॉ.अनिकेत मंडाले यांच्या चारचाकीचेही नुकसान झाले. शिवाय अनेक वाहनांनाही लक्ष्य करुन नुकसान करण्यात आले. सुमारे तासभर ही दगडफेक सुरु होती. त्यामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण
झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पीआय किशोरकुमार परदेशी यांच्यासह पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत धुळ्यातूनही अधिकार्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा दोंडाईचाकडे रवाना झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखण्याचे आवाहन केले. दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडलेला दिसत होता. दगडफेकीत अनेकजण जखमी झाल्याचे
समजते.
शहरात आता तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी संशयीतांची धरपकड सुरु केली आहे. शहरात यापुर्वीही १४एप्रिलला मिरवणुकीवर दगडफेक करुन सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आणू पहणार्या विघातक प्रवृत्तींना वेळीच अद्दल घडवा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.