खान्देश वार्ता-(धुळे)
साकी तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील सोलर विद्युत निर्मिती प्लान्ट परिसरातून कॉपर केबल चोरी करणार्या चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व निजामपूर पोलिसांच्या पथकाने शिताफिने जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकीसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून संयुक्तरित्या साक्री-निजामपूर रोडवरील सोलर विद्युत निर्मिती प्लान्ट परिसरात गस्त सुरू होती. त्यादरम्यान कॉपर केबल चोरीचे गुन्हे अबरार अली फत्तु सैय्यद (रा.निजामपूर) याने त्याच्या साथीदारांसह केले असुन, तो चोरी करण्यासाठी सोलर प्लान्ट परिसरात दुचाकीने फिरत असल्याची गोपनिय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शोध घेत संशयीतास पकडले.
त्याने त्याचे अबरार अली फत्तु सैय्यद (वय ३४ रा.मरकस मशिदजवळ, निजामपूर) असे व आपले भंगार खरेदी-विक्रीचे दुकाने असल्याचे सांगीतले. गुन्ह्याबाबत कसुन विचारपुस केली असता, त्याने साथीदार योगेश गोरख वाघमोडे, रतन हरी बोरकर, सागर ताथु बोरकर सर्व (रा.वाघापूर ता.साक्री), आदिल अश्पाक तांबोळी (रा.निजामपूर) व दोन आरोपी यांच्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली.
तसेच चोरी केलेला मुद्देमाल हा सोलर प्लान्ट परिसरातील काटेरी झुडपातुन काढुन दिला. त्यात कॉपर केबल व दुचाकी असा १ लाख २९ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून कॉपर केबल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि मयुर भामरे, प्रदिप सोनवणे व स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब सुर्यवंशी, दिनेश परदेशी, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, सुशिल शेंडे, सुनिल पाटील यांनी केली आहे.