खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्ह्यातील शिंदखेडा येथील पंचायत समितीतील विस्तार अधिकारी असलेले संतोष किसन सावकारे यांनी एका ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागीणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पीडित ग्रामसेविकेने शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना सोबत घेवून पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्यांचे दालनात येवून जाब विचारला.
यावेळी संतप्त झालेल्या शानाभाऊ सोनवणेंसह पीडित ग्रामसेविकेने विस्तार अधिकारी सावकारे यांना चोप दिला. तर ग्रामसेविकेने त्यांच्या तोंडाला काळे फासले. या घटनेमुळे शिंदखेडा शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात सावकारे यांच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, शिंदखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका गावात कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय महिला ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे वरीष्ठ असलेले शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे (वय५८) हे सन २०२० ते २०२१ दरम्यान बेटावद ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रशासक असतांना तेथे त्या ग्रामसेवक म्हणुन कार्यारत होत्या.
त्यावेळी सावकारे यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी शरीरसुखाची मागणी करून चारचाकी वाहन देण्याचे अमिष दाखवले होते. तसेच सन २०२३ ला तावखेडा या गावी त्या ग्रामसेवक असतांना सावकारे हे तेथे ग्रामपंचायतचे प्रशासक असतांना तेथेही त्यांनी वारंवांर शरीर सुखाची मागणी केली होती. ग्रामसेविकेने तसे न केल्यास त्यांची विभागीय चौकशी सुरू करेल अशी धमकी दिली होती. यानंतर दि. २५ नोव्हेंबर रोजी सावकारे यांनी ग्रामसेविकेच्या मोबाइल संपर्क करून त्यांना एका ग्रामसेविकेच्या घरी येवून भेटण्यास सांगितले.
तसेच त्यांना नेहमी एकटीला बोलावून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करून त्यांचा विनयभंग करीत असत एकेरी भाषेने बोलणे, कर्मचाऱ्यांसमोर अपमानित करणे अशी वागणूक देत असत परंतू त्या एक महिला असल्याने व संतोष सावकारे हे त्यांचे वरीष्ठ अधिकारी असल्याने त्या त्यांच्या विरूध्द तक्रार देण्याचे टाळत होत्या. मात्र सावकारे त्यांना नेहमीच धमकी देत होते की, मी तुमची ग्रामपंचायत संदर्भात ०१ ते ०४ दप्तरची चौकशी लावून विभागीय चौकशी पाठवून देईल, अशी धमकी देत असल्याने ग्रामसेविकेने याबाबत ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्षांना सांगितले. तालुका अध्यक्षांनीही विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांना समजावून सांगुन समज दिली होती. मात्र तरी देखील गुरुवार (दि.२८)रोजी दुपारच्या सुमारास ग्रामसेविका शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयात सावकारे यांच्या टेबल जवळ गेल्या असता तेथे संतोष सावकारे यांनी ग्रामसेविकेकडे पुन्हा शरीर सुखाची मागणी करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
या प्रकारामुळे ग्रामसेविका रडत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना भेटल्या त्यांना सर्व आपबिती सांगितल्यानंतर शानाभाऊ सोनवणे यांनी शिसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामसेविकेला सोबत घेवून शिंदखेडा पंचायत समिती कार्यालय गाठले. तेथे ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांना जाब विचारला. तेंव्हा सावकारे यांनी त्यांच्याशी वाद घातला. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामसेविकेसह शानाभाऊ सोनवणे व पदाधिकारी कार्यकत्यांनी संतोष सावकारे यांना चोप दिला. तर ग्रामसेविकेने त्यांच्या तोंडाला काळे फासले.
यावरुन विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांचेविरुध्द भारतीय न्याय सहीता कायदा २०२३ चे कलम ७४, ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु सुर्यवंशी करीत आहेत. दरम्यान, हे प्रकरण वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले असून त्यांनी कठोर कारवाई करण्याचे अश्वासन दिले आहे.