खान्देश वार्ता-(धुळे)
शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर अवधान एमआयडीसी मध्ये टावर मसाले ब्रँड या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी अचानक छापा टाकला. या कारखान्यात निकृष्ट लाल मिरची व पावडर, सडका लसूण, निकृष्ट खाद्यतेल व केमिकल युक्त रंग मिसळून आरोग्यास हानिकारक असलेला मिरची मसाला तयार केला जात असल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या पथकाने हा कारखाना उद्ध्वस्त करून सीलबंद केला आहे तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बदकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या पथकाने मसाल्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या अहवालानंतर कारखाना मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
शहरालगत अवधान एमआयडीसी मध्ये इमरान अहमद अख्तर हुसेन नामक व्यक्ती हा निकृष्ट लाल मिरची व पावडर, सडका लसूण, निकृष्ट खाद्यतेल, केमिकल युक्त रंग मिसळून आरोग्यास हानिकारक मिरची मसाले तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. या कारखान्यात भेसळयुक्त मसाले तयार केले जात असल्याची माहिती बुधवार (दि.२५) रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपल्या अधिकारी व पथकासह या कारखान्यावर छापा टाकला.
या ठिकाणी इमरान अहमद अख्तर हुसेन (रा. मुस्लिम नगर हजार खोली धुळे), जैद अहमद जलील अहमद अन्सारी (रा.फातिमा मशिदजवळ शंभर फुटी रोड धुळे), महसूद अहमद अब्दुल करीम (रा.मौलीगंज घड्यावाली मशीदजवळ धुळे) हे तिघे कारखाना चालवताना आढळून आले.
या कारखान्यात मिरची दळण्याकरता व तिची पावडर तयार करणारे मशीन, केमिकल युक्त रंग व मिरची पावडर एकत्र करण्यासाठीचे मिक्सर पॅकिंग मशीन, केमिकल युक्त रंगाचे डबे, निकृष्ट खाद्यतेल, निकृष्ट लाल मिरची, सडका लसूण, भेसळयुक्त तयार केलेला मिरची पावडर मसाला काही गोण्यांमध्ये पडलेला साठा आढळून आला. हा भेसळयुक्त मसाला आरोग्यास हानिकारक असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे.
कारखाना मालक मिरची मसाले तयार करून त्याची विक्री करीत आहेत. या कारवाईनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलवून मुद्द्यामाल ताब्यात घेण्यात आला आहे. या मुद्देमालाची न्याय वैद्यक प्रयोगशाळे कडून तपासणी केली जाणार आहे. प्रयोगशाळाचा अभिप्राय मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पुढील कारवाई देण्यात करण्यात येणार आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील व पथकातील प्रशांत चौधरी मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संतोष हिरे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयूर पाटील, हर्षल चौधरी व मोहाडी पोलीस ठाण्यातील संदीप कदम, जय चौधरी यांनी केली आहे.