खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील देवपूर भागातील समर्थ कॉलनीत एका बंद घरात पती-पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पती गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी व दोन्ही मुले जमिनीवर निपचित पडल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. त्यामुळे पतीने पत्नीसह दोन्ही मुलांना विष देवून स्वतः आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. तर हा घातपात असल्याचा संशय नातलगांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून या कुटुंबियांचे मृतदेह बंद घरात असल्याने परिसरात वास येत होता. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवपुरमधील प्रमोद नगरजवळील समर्थ कॉलनीत प्लॉट नं. ८मध्ये प्रवीणसिंह मानसिंह गिरासे (वय५२), पत्नी सौ. दीपांजली प्रवीणसिंह गिरासे (वय४४), मुलगा सोहम गिरासे (वय१८) व मितेश गिरासे (वय१३) यांचे कुटुंब वास्तव्यास होते. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचे घर बंद होते.
गुरुवारी सकाळी घरातून वास येवू लागल्याने परिसरातील नागरिकांनी प्रवीणसिंह गिरासे यांची बहीण संगीता योगेंद्रसिंह राजपूत ह्या घरी आल्या. त्यांनी दरवाजा ठोठावून प्रवीणसिंह यांना आवाज दिला. परंतु, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहीले. यावेळी घरात त्यांना चौघांचे मृतदेह दिसून आले. त्यामुळे त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी परिस्थिती पाहून पोलिसांना माहिती कळविली.
पश्चिम देवपूर पोलीसठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण कौठुळे यांच्यासह चंद्रकांत नागरे, सुनील राठोड तसेच गुन्हा शाखायचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रकाश सोनार, निलेश पोतदार घटनास्थळी दाखल झाले. शिवाय सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे, माजी नगरसेवक कमलेश देवरे, माजी नगरसेवक भगवान गवळी, प्रफुल्ल पाटील, ऍड. अमित दुसाने यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर प्रवीणसिंह गिरासे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. तर पत्नी दीपांजली व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. यावरुन पतीने अगोदर पत्नीसह दोघा मुलांना विष देवून मारले व त्यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली असावी, असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, मयत प्रवीणसिंह यांची बहीण संगीता यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रवीणसिंह यांच्या परिवारात सर्वकाही व्यवस्थित होते. घरात कोणतेही वाद नव्हते त्यामुळे ते आत्महत्या करु शकत नाहीत, हा घातपातच असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, मयत प्रवीणसिंह यांची पारोळारोडवरील आर.आर.पाटील कॉम्प्लेक्समध्ये कामधेनू ऍग्रो (फर्टीलायझर) एजन्सी होती.