
खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी खुशी राहते या बालिकेचे लचके तोडून कुत्र्यांनी तिला ठार केले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी महापालिकेकडे गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत असताना मनपाने कोणतेही कारवाई केलेली नाही. त्यामुळे खुशीच्या मृत्यूप्रकरणी मनपा आयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार अर्ज दिला आहे. प्रभादेवी परदेशी यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देवपुरातील बोरसे नगरात सहा जून रोजी खुशी राहते ही एक वर्षीय बालिका झोक्यात झोपलेली होती. तिचे आई-वडील कामावर असताना मोकाट कुत्र्यांनी घरात शिरून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
तिचे कोथळे काढत तिला ठार केले. वास्तविक मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, यासाठी मी मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. तसेच वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. परंतु आयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांनी खोटे आश्वासन देण्या व्यतिरिक्त कोणतेही ठोस कारवाई केलेली नाही. परिणामी निष्पाप चिमुकलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
या चिमुकलीच्या निर्गुण हत्ये सर्वस्वी आयुक्त व संबंधित स्वच्छता निरीक्षक कारणीभूत आहेत. त्यांनी योग्य वेळेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर निष्पाप चिमुकलीचा जीव वाचला असता. त्यामुळे आयुक्तांसह स्वच्छता निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रीमती परदेशी यांनी केली आहे.
महापालिकेत कुत्रे नेल्या प्रकरणी प्रभादेवी परदेशी यांच्यावर गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करताना जी तत्पर्यता पोलिसांनी दाखवली. तशीच तत्पर्यता आता पोलिसांनी दाखवावी. आयुक्तांसह निरीक्षकांवर त्वरित गुन्हा दाखल करावा. अशी मागणी श्रीमती परदेशी यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर श्रीमती परदेशी यांनी सांगितले आहे की, माझ्यावर गुन्हा दाखल केला तेव्हा माझी चौकशी का केली नाही. यामुळे येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न केल्यास पाचव्या दिवशी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी श्रीमती परदेशी यांनी दिला आहे.