खान्देश वार्ता-(धुळे)
तक्रारदार यांचे रेशन कार्ड नसल्याने तक्रारदार यांनी त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी पुरवठा निरीक्षक यांच्याकडे अर्ज भरून सादर केला होता. यावेळी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी पुरवठा निरीक्षक प्रमोद विश्वासराव डोईफोडे यांनी पंधराशे रुपयांची मागणी केली होती.
मात्र तक्रारदार यांनी निरीक्षक डोईफोडे यांना एक हजार रुपये दिले होते. यानंतरही निरीक्षक डोईफोडे यांनी तक्रारदार यांचे रेशन कार्ड बनवून दिले नव्हते. रेशन कार्ड बाबत तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता, तक्रारदार यांच्याकडे उर्वरित पैश्यांची मागणी करण्यात आली.
याबाबत नंदुरबार लाचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांच्या विरोधात तक्रार केली असता गुरुवार दि.२२ रोजी तक्रारदार यांच्याकडून उर्वरित पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना निरीक्षक डोईफोडे यांना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे.