खान्देश वार्ता-(धुळे)
पारोळा तालुक्यातील शिवर दिगर येथील वीटभट्टी व्यवसायिकाकडून २५ हजार रुपये लाचेची मागणी करून ही रक्कम स्वीकारणाऱ्या महिला तलाठीला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ताब्यात घेऊन पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
पारोळा तालुक्यातील शिवर दिगर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचा वीट भट्टीचा व्यवसाय आहे. वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता होती. मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी शिवरदिगर येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदाराकडून गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता २५ रुपये जमा करून घेतले. त्यानंतर तक्रारदाराने गौण खनिज परवान्याची चौकशी करण्याकरता तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली. मात्र त्यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी दिलेल्या पैशांची पावती न देता त्या व्यतिरिक्त पुन्हा २५ रुपये लाचेची मागणी केली.
यावरून धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रारदाराने तक्रार दिली असता त्याची पडताळणी करून तलाठी वर्षा काकुस्ते यांना शुक्रवारी दुपारी शासकीय निवासस्थानी २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने केली आहे.